गुढी पा़डवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला सण त्यामुळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेरही मराठी बांधवांकडून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Gudhi Padwa 2022) दाराला तोरण बांधून आणि चैतन्याची गुढी उभारुन एकमेकांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. सण म्हटल्यावर गोडाधोडाचे जेवण ओघानेच आले. पाडव्याच्या दिवशी आपल्याकडे सामान्यपणे श्रीखंड आणि पुरीचा बेत केला जातो. याबरोबरच कोरडी भाडी, कोशिंबीर, तळण, चटणी, वरण भात हे असतेच. श्रीखंड पुरी म्हटल्यावर आपणही अतिशय आवडीने आणि ४ घास जास्तच जेवतो. भर उन्हात साग्रसंगीत जेवण केल्यावर आपल्याला ग्लानी यायला लागते. अनेकांसाठी हा दिवस सुट्टीचा असल्याने आपण दुपारच्या वेळी थोडा वेळ ताणूनही देतो. इतकेच नाही तर उन्हाळ्यात सतत पाणी पाणी होत असते. त्यात गोड श्रीखंड किंवा आम्रखंड खाल्ल्याने आपल्याला आणखी तहान लागते आणि आपण नेहमीपेक्षा जास्त पाणी पितो. दुपारच्या जेवणामुळे आपल्याला काहीसे जड झाल्यासारखे वाटत असेल तर अशावेळी रात्री थोडा हलका, पोटाला सहज पचेल असा आहार घ्यायला हवा. नाहीतर सणवार अंगाशी येण्याची शक्यता असते. पाहूयात सणाच्या दिवशी रात्री आपण कोणते पदार्थ करु शकतो.
१. मूग किंवा मसूराची खिचडी
खिचडी हा आपल्याकडे कंटाळा आल्यावर, खूप दमल्यावर किंवा बरे नसल्यावर नेहमी केला जाणारा पदार्थ. तांदूळ आणि मूगाची डाळ पचायला हलकी असल्याने रात्रीच्या वेळी खिचडी खाल्लेली केव्हाही चांगली. दुपारी जास्त जेवण झाले असेल आणि शरीराला कॅलरीजची फारशी आवश्यकता नसेल तर खिचडी, ताक आणि पापड असा मेन्यू आपण रात्रीच्या जेवणासाठी आवर्जून करु शकतो.
२. डाळींचे धिरडे
डाळींमधून शरीराला जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते. त्यामुळे डाळी खाल्लेल्या केव्हाही चांगल्या. त्यामुळे मूगाची डाळ किंवा उडदाची डाळ, हरभरा डाळ यांच्या पिठाचे झटपट धिरडे आपण या दिवशी संध्याकाळी आवर्जून खाऊ शकतो. त्यासोबत दुपारी केलेली चटणी किंवा कोशिंबीर अगदीच नाही तर सॉस, लोणचे, दही असे काहीही छान लागते. पण पोटभरीचे आणि तरीही पचायला हलके असलेल्या धिरड्यांचा पर्याय चांगला आहे.
३. दहीभात
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराची लाहीलाही होत असते. अशात दुपारी गोडाधोडाचे जास्तीचे जेवण झाल्याने आपल्याला एकप्रकारचा आळस आणि थकवा आलेला असतो. त्यामुळे झटपट होणारा आणि तरीही पौष्टीक असा दहीभात आपण या दिवशी संध्याकाळी आवर्जून करु शकतो. दुपारचा भात उरला असेल तर हे काम आणखी सोपे होते. दही, साखर, मीठ आणि जिरे आणि मिरचीची फोडणी दिलेला हा भात अतिशय चविष्ट लागतो.
४. सॅलेड
सॅलेड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला फारशी भूक लागत नाही. पण सतत तहान लागते. अशावेळी शरीराला पाणीदार गोष्टी देणे फायद्याचे ठरते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पनीर, काकडी, डाळींब, कलिंगड, दाणे अशा गोष्टींचे हेल्दी सॅलेड केल्यास त्यामुळे आपले पोटही भरते आणि शरीर हलके राहण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी एरवीही आणि सणाच्या दिवशी खाण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो.