कट.... कट.. कट... असा आवाज करायचा आणि हाताची, पायाची सगळी बोटं मोडून मोकळं व्हायचं, अशी अनेकांची सवय असते. खास करून बोटं मोडण्याची सवय पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येते. काम सुरू असताना थोडा रिकामा वेळ मिळाला की बोटं मोडण्याचं काम सुरू होतं. किंवा काही काही जणींना तर बोटं मोडण्याची इतकी सवय असते की चहा प्यायची जशी लहर येते, तशी बोटं मोडण्याचीही लहर येते. मग खास बोटं मोडण्यासाठी वेळ घेतला जातो आणि काट,.. काट.. बोटं मोडून हात- पाय मोकळे केले जातात.
खूप जास्त बोटं माेडण्याची सवय अजिबात चांगली नाही. त्यामुळे ही सवय शक्य तेवढ्या लवकर सोडावी. यामुळे एकतर हाडांच्या गॅपमध्ये असणारं लिक्वीड कमी होतं. त्यामुळे वय वाढल्यानंतर हात- पायावर सूज येणे, हात- पाय ठणकणे असा त्याचा त्रास जाणवू शकतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त बोटं मोडण्याची सवय असेल तर हात, पायाच्या बोटांचा आकारही बदलू शकतो. त्यामुळे सतत बोटं मोडणं आरोग्यासाठी चांगले नाही.
बोटं मोडण्याची सवय तोडण्यासाठी... १. जेव्हा बोटं मोडण्याची खूप तीव्र इच्छा होईल तेव्हा दोन्ही हात लांब करा आणि हाताच्या बोटांची उघडझाप करा. म्हणजे हाताच्या मुठी घाला आणि उघडा... अशी क्रिया वारंवार केल्यास बोटं आपोआप मोकळे होतात आणि मग बोटं मोडावे, असं वाटत नाही. २. बोटं मोडण्याची सवय एकदम सुटणार नाही. ती हळूहळू कमी करावी लागेल. त्यामुळे दिवसातून जेवढ्या वेळा बोटं मोडता, ते प्रमाण निम्म्यावर आणा. हळूहळू सवय कमी करा...
३. कायम कशात तरी बिझी राहण्याचा प्रयत्न करा. बोटं मोडायची इच्छा झाली तर मनाला असे सांगा की बोटं माेडायची आहेत, पण त्यासाठी अर्धा तास वाट पहावी लागणार नाही. अर्ध्या तासाचा नियम कटाक्षाने पाळा. अर्ध्या तासानंतर पुन्हा तेच मनाला सांगा आणि हा गॅप वाढवत न्या. सुरूवातीला त्रास होईल पण हळूहळू सवय कमी होईल. ४. बोटं मोडायची सवय अशीच राहीली तर काही वर्षांनंतर आपल्या हातापायाची बोटे वाकडी, बेढब होऊ लागतील, असे चित्र डोळ्यासमोर आणा. त्यामुळे मग आपोआपच बोटं मोडावी वाटणार नाहीत.