देशात कोरोना माहामारीशी लढण्यासाठी लसीकरण अभियान वेगानं सुरू आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५ कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी जवळपास ४० ते ५० लाख लोकांचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत ३ कोटी ११ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या संक्रमणातून बरे झाले आहेत. तर आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. म्हणूनच कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंगसारख्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. याशिवाय लसीकरण पूर्ण करणं महत्वाचं आहे.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. माला श्रीवास्तव यांनी सांगितले की, ''पहिल्या लाटेत कोरोनाचा गर्भवती महिलांवर जास्त परिणाम दिसून आला. संक्रमण झाले तरी कमी वेळात रुग्ण बरे होताना दिसून आले. दुसऱ्या लाटेतही व्हायरसचा परिणाम गरोदर महिलांवर पडत होता जसे की अन्य आजार उद्भवतात. गरोदर महिलांसाठी लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर गरोदर महिलांना लस देणं हेच आमचं लक्ष्य आहे. ''
लस घेतल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवू शकते?
डॉ माला श्रीवास्तव म्हणतात, ''लसीकरणानंतर केस गळण्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. हे इतर काही कारणांमुळे असू शकते. लसीकरणानंतर काही लोकांमध्ये दिसून आलेले दुष्परिणाम म्हणजे सौम्य ताप, हात दुखणे, शरीर दुखणे. पण एक किंवा दोन दिवसातच यामुळे आराम मिळतो.''
प्रेग्नंसीत कोरोनातून बरं झाल्यानंतर पोस्ट कोविडची लक्षणं दिसू शकतात?
डॉ. माला श्रीवास्तव म्हणतात, ''प्रत्येक व्यक्तीमध्ये पोस्ट कोविड लक्षणं दिसतातच असं नाही. परंतु काही लोकांमध्ये कोविडनंतर, खोकला कायम राहू शकतो, प्रचंड थकवा येऊ शकतो, साखरेची पातळी देखील वाढू शकते किंवा इतर काही समस्या असू शकतात. परंतु हे सर्व त्यांच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. कोविड नंतर, शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या आणि वेळीच लस घ्या.''
पुढे त्या म्हणतात, ''कोरोना संसर्ग कोणालाही कधीही होऊ शकतो. म्हणूनच आपल्याकडे कोरोनाविरूद्ध रोगप्रतिकारकशक्ती असणे खूप महत्वाचे आहे आणि शरीरात अँटीबॉडीज केवळ लसीतूनच येतील. म्हणूनच, गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर, आपण लस घेऊ शकता. यामुळे गर्भातील मुलाच्या किंवा स्त्रीच्या विकासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. ही लस केवळ शरीरात जाऊन एंटीबॉडी बनवते. स्तनपान करत असलेल्या माता देखील लस घेऊ शकतात आणि बाळाला कोणत्याही वेळी आहार देऊ शकतात.''
दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तर?
जर काही कारणामुळे दुसरा डोस उशीर झाला, तरीही तो जमेल तेव्हा टोचून घ्या. कोणतीही अडचण येणार नाही, लस पूर्णपणे प्रभावी ठरेल आणि शरीरात एंटिबॉडी देखील तयार होतील.