Join us   

हरितालिकेचा उपवास करताना तब्येतीला त्रास नको, लक्षात ठेवा ४ गोष्टी - गणपतीच्या तयारीसाठी राहा फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 3:59 PM

Haritalika Vrat Poojan Fasting Tips Ganpati Festival : हरतालिकेचा उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी

ठळक मुद्दे एकूणच या काळात दगदग होण्याची शक्यता असल्याने महिलांनी योग्य ती काळजी घेऊन उपवास करावा.तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको. 

गणपती बाप्पाचे आगमन होण्याच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन केले जाते. कुमारीकां, तरुणी, विवाहित स्त्रिया सगळ्याच हरतालिकेचे पूजन करतात. हरतालिकेचं व्रत हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानलं जातं. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये  भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवण्याचीही परंपरा आहे. धार्मिक महत्त्व म्हणून किंवा श्रद्धा म्हणून महिला उपवास करतात खऱ्या. पण या काळात उपवासाने काही जणींना त्रास होण्याची शक्यता असते. पोटाला आराम मिळावा हे उपवासामागचे एक महत्त्वाचे कारण असले तरी त्याचा शरीराला त्रास झाला तर मात्र आपले अवघड होऊन जाते(Fasting Diet Tips). पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी घ्यायला हवी. उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडला तर तब्येत खराब होण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे हरतालिकेचा उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी (Haritalika Vrat Poojan Ganpati Festival)...

१. रीकाम्या पोटी कामं करणं टाळा

सणवार म्हणजे महिलांना दुप्पट कामं असतात. साफसफाई, स्वयंपाकाशी निगडीत गोष्टींची तयारी, नैवेद्याची तयारी आणि इतर पुजेच्या गोष्टींची तयारी. हे सगळे करताना आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. 

२. अॅसिडीटी, गॅसेस

पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण झालेली असते. यामध्ये आपण तळकट, दाण्याचे, साबुदाणा, बटाटा असे वातूळ पदार्थ खाल्ले तर ही अॅसिडीटीची समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे आपली प्रकृती कशी आहे हे लक्षात घेऊन मगच उपवास करावा. उपवासाचे पदार्थ खाताना आपल्याला झेपतील असेच पदार्थ खावेत. यामध्ये फळे, सुकामेवा, राजगिरा, दही-ताक यांचा आवर्जून समावेश करायला हवा.

३. आरोग्याच्या समस्या असतील तर अट्टाहास नको

उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करु नये. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा. ज्यांना डायबिटीस, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करुन मगच उपवास करावा. तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको. 

४. उपवास सोडताना 

हरतालिकेचा उपवास साधारणपणे गणपतीची स्थापना झाल्यानंतर सोडला जातो. त्यामुळे हा उपवास जवळपास दिड दिवसाचा होतो. गणपतीची स्थापना म्हणजे घरात पाहुणे, त्यांच्या जेवणाची गडबड, गणपतीचे डेकोरेशन, त्याला नैवेद्य अशा असंख्य गोष्टी असतात. या सगळ्यात आपण जर नीट खाल्ले नसेल किंवा आपली झोप व्यवस्थित झाली नसेल तर आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. एकूणच या काळात दगदग होण्याची शक्यता असल्याने महिलांनी योग्य ती काळजी घेऊन उपवास करावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनागणपतीहरतालिका व्रत