गणपती बाप्पाचे आगमन होण्याच्या आदल्या दिवशी केले जाणारे व्रत म्हणजे हरतालिकेचे. हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानलं जातं. या दिवशी कुमारीका, तरुणी, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच बऱ्याच महिला हरतालिकेचे व्रत निर्जल करतात. धार्मिक महत्त्व म्हणून किंवा श्रद्धा म्हणून उपवास करणे ठिक आहे. पण या उपवासाचा आरोग्याला त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. नाहीतर त्यापुढे येणारा गणपती उत्सव महिला एन्जॉय करु शकणार नाहीत. गणपतीत आधीच भरपूर कामं आणि धावपळ असल्याने तब्येत चांगली असेल तर बाप्पांचे कौतुक आनंदाने करता येईल. तेव्हा उपवास करताना लक्षात ठेवायला हव्यात अशा ४ महत्त्वाच्या गोष्टी (Hartalika Vrat Poojan Upwas Fasting Health Diet Tips for ganpati Festival)...
१. वातूळ पदार्थ टाळा
उपवास म्हटला की साधारणपणे साबुदाणा, बटाटा, तेलकट पदार्थ, दाणे या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्या जाण्याची शक्यता असते. पण पावसाळी हवा आणि एकूणच तब्येतीला हे पदार्थ मानवणारे नसल्याने शक्यतो हे पदार्थ टाळावेत. त्याऐवजी राजगिरा पीठ, उपवासाची भाजणी, फळं, ताक, दूध, खजूर या गोष्टी खाल्लेल्या केव्हाही जास्त चांगल्या.
२. उपाशी पोटी कामं करु नका
सणवार म्हणजे महिलांना दुप्पट कामं असतात. साफसफाई, स्वयंपाकाशी निगडीत गोष्टींची तयारी, नैवेद्याची तयारी आणि इतर पुजेच्या गोष्टींची तयारी. हे सगळे करताना आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
३. तब्येतीच्या जुन्या तक्रारी लक्षात घेऊन उपवास करा
उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करु नये. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा. ज्यांना डायबिटीस, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करुन मगच उपवास करावा. तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको.
४. उपवास सोडताना
हरतालिकेचा उपवास बहुतांश महिला दुसऱ्या दिवशी गणपती बसले की मगच सोडतात. गणपतीच्या आदल्या दिवशी डेकोरेशन, बाप्पाला नैवेद्य, बाकी तयारी, पाहुणे येणार असतील तर त्याची तयारी अशा भरपूर गोष्टी असतात. त्यामुळे महिलांची आधीच दगदग झालेली असते. त्यात पोटात काही नसेल तर ऐन गणपती बसण्याच्या दिवशी थकवा येण्याची शक्यता असते. तसेच गणपतीला मोदकांचा नैवेद्य असल्याने हा मोदकाचा स्वयंपाक करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे गणपती बसतात त्या दिवशी सकाळच्या वेळी फळं, पोटभर उपवासाचे पदार्थ असे नक्की खायला हवे. तसेच जेवणात जास्त मसालेदार, तेलकट काही नको.