ओमायक्रॉन या विषाणूने आधीच्या कोरोना लाटींपेक्षा जास्त धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. या विषाणूची लक्षणे सौम्य असली तरी तो प्रचंड वेगाने पसरत असल्याने प्रत्येक घरात सध्या ताप, सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोना टेस्ट निगेटीव्ह असली तरी साधा ताप, सर्दी झालेलेही अनेक रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. असे असताना आपण आणि आपले कुटुंबिय सगळेच घरात कॉरंटाइन आहेत. आता एकीकडे औषधोपचार, तापाने किंवा घसादुखी आणि खोकल्याने आलेला थकवा यांमध्ये सतत पडून राहावे लागते. फुफ्फुसे, मज्जासंस्था, श्वसनसंस्थेवर आणि पचनसंस्थेवर आघात करणाऱ्या या संसर्गामुळे पार थकून गेल्यासारखे होते. एरवी सतत येणारी झोप या काळात मात्र अजिबात येत नाही. अशावेळी घरात क्वारंटाइन असताना बेडवर किंवा हॉस्पिटलमध्येही बसल्या बसल्या करता येतील असे सोपे व्यायामप्रकार केल्यास त्याचा शरीराला निश्चितच चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठी काही प्राणायाम सांगतात ते नेमके कोणते पाहूया...
१. नाकाने श्वास घेणे तोंडाने बाहेर सोडणे
ताप, सर्दीसारखा संसर्ग झाला की आपल्याला श्वसनाला काही प्रमाणात त्रास होतो. मोकळा श्वास घेता यावा यासाठी श्वसनाचे काही व्यायाम करणे अतिशय उपयुक्त ठरते. कोरोना व्हायरस किंवा कोणताही व्हायरस आपल्या फुफ्फुसात पसरु नये यासाठी श्वसनाचे व्यायामप्रकार करायला हवेत. नाकाने श्वास घेऊन तोंडावाटे तो बाहेर सोडावा. त्यामुळे तुमची श्वसनसंस्था मोकळी व्हायला मदत होते. सर्दी झालेली असताना नाकाने श्वास बाहेर सोडणे फार अवघड होते अशावेळी तोंडाने श्वास बाहेर सोडल्यास आपल्याला बरेच फ्रेश वाटू शकते. याचे कारण म्हणजे शरीरातील कार्बनडाय ऑक्साइड बाहेर पडतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
२. पोटच्या मदतीने प्राणायाम
फुफ्फुसाला लागून खाली असणारा भाग म्हणजे पोटाच्या वरचा भागाचा वापर करुन हे प्राणायाम करायला हवे. यामुळे तुम्ही पूर्णपणे श्वास आत घेता आणि बाहेर सोडता. त्यामुळे एकप्रकारे तुमची फफ्फुसे मोकळी होण्यास मदत होते. पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून जवळ घ्यावेत. एक हात पोटावर ठेवावा आणि पोटाचे स्नायू वरच्या बाजूला असतील तेव्हा श्वास घ्यावा आणि हे स्नायू आतल्या बाजूला असतील तेव्हा श्वास सोडावा. पोटाच्या आधारे हा व्यायाम केल्यास फुफ्फुसांसाठी उपयोग होतो. सकाळी १० वेळा आणि संध्याकाळी १० वेळा हा प्राणायाम जरुर करावा. इतकेच नाही तर तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा हा व्यायाम केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. यामुळे तुमचे डोकेही रिलॅक्स व्हायला मदत होते.
३. पवनमुक्तासन
कोणताही संसर्ग झाला की त्याचा परिणाम नकळत आपल्या पचनसंस्थेवर होत असतो. यामध्ये गॅसेस, सतत संडासला जाणे किंवा पोट योग्य पद्धतीने साफ न होणे, मळमळ अशा तक्रारी उद्भवतात. पण पचनसंस्थेचे काम योग्य पद्धतीने व्हावे असे वाटत असेल तर पवनमुक्तासन हा उत्तम उपाय आहे. पाठीवर झोपून एक पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही हातांच्या साह्याने पाय छातीकडे ओढावा. असे दोन्ही पायांनी करावे. यानंतर दोन्ही पाय एकत्र जवळ घेऊन असेच करावे. यामध्ये पोटाचा तर व्यायाम होतोच पण यकृताचाही व्यायाम होण्यास मदत होते.
४. यष्टीकासन
पाठीवर झोपून खोल श्वास घेऊन दोन्ही हात शरीराच्या रेषेत सरळ वर घ्यावेत. वर घेतलेल्या हातांना थोडा ताण द्यावा. पाय खालच्या दिशेने ताणावेत. त्यामुळे संपूर्ण शरीराला एकप्रकारचा ताण मिळतो. श्वास सोडत पाय आणि हात पुन्हा पूर्वपदावर आणावेत. तुमच्या शरीराची हालचाल अतिशय सौम्यपणे करावी. हे आसन तुम्हाला जमेल तसे ५ ते १० वेळा करावे. मात्र कोणतेही आसन करताना तुम्हाला थकवा जाणवायला नको. जर आसन केल्यानंतर तुम्हाला थकवा वाटत असेल तर ते आसन एकदा किंवा दोनदाच करा.