डायबिटीस म्हणजे हळूहळू शरीर पोखरणारा आजार. डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी वेळीच योग्य ती काळजी घेतली तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढत नाहीत. मात्र योग्य वेळी साखर नियंत्रणात ठेवली नाही तर एकानंतर एक गुंतागुंत होत जाते आणि अनेक समस्या निर्माण होतात. डायबिटीस असणाऱ्यांनी वेळच्या वेळी जेवणे, गोड अतिशय कमी खाणे, भात खाण्यावर नियंत्रण ठेवणे यांसारखे आहाराचे नियम पाळायला हवेत. याबरोबरच भाज्या आणि फळे खाण्याबाबतचेही काही नियम डायबिटीस असणाऱ्यांनी आवर्जून पाळायला हवेत. थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या आणि फळांची सरबराई असते. तसेच थंडीत खाल्लेले अन्न चांगल्यारितीने पचत असल्याने आहारात भाज्या आणि फळांचा समावेश वाढवावा असे सांगितले जाते. मात्र हे सामान्यांसाठी असून डायबिटीस असणाऱ्यांनी मात्र काही फळे आणि भाज्या टाळायला हवीत.
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डायबिटीस अँड डायजेस्टीव्ह अँड किडणी डिसीजने सांगितलेल्या माहितीनुसार, डायबिटीस असणाऱ्यांनी आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करायला हवा. त्यामुळे हृदयाचे विकार आणि कॅन्सरसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. फळांमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. मात्र काही फळे आणि भाज्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्या डायबिटीसच्या रुग्णांसाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी आहारात ही ठराविक फळे आणि भाज्या घेणे टाळायला हवे. भाज्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी चांगले असले तरी काही भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा शरीरावर उलटा परीणाम होऊ शकतो. पाहूयात डायबिटीस असणाऱ्यांनी कोणती फळे आणि भाज्या टाळाव्यात....
१. जास्त गोड फळे
ग्लायसेमिक इंडेक्सवरुन कोणता पदार्थ खाल्ल्यावर एखाद्या व्यक्तीची रक्तातील साखर किती वाढते हे समजते. जर एखाद्या जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० ते १०० दरम्यान असेल तर त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामध्ये कलिंगड आणि जास्त पिकलेले केळे या दोन फळांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे अशाप्रकारची जास्त गोड असणारी फळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी योग्य नसतात.
२. कार्बोहायड्रेटस जास्त असणारी फळे
तुमच्या आहारातून किती कार्बोहायड्रेटस शरीरात जातात त्यावरुन तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वरखाली होत असते. त्यामुळे ज्या फळांमध्ये कार्बोहायड्रेटस जास्त असतात अशी फळे टाळलेली केव्हाही चांगली. सफरचंदासारख्या फळांमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने अशाप्रकारची फळे खाणे टाळावे.
३. फळांचा रस
जेवणासोबत फळ खाणे किंवा कोणत्याही फळांचा रस पिणे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी घातक असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर फळे कमीत कमी खायला हवीत.
४. बटाटा किंवा रताळे
रताळे आणि बटाटा या दोन्ही फळांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच या दोन्ही गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे तुम्हाला शुगर असेल तर तुम्ही या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात. केवळ भाजी स्वरुपातच नाही तर चिप्स, फ्रेंच फ्राइज यांसारख्या गोष्टीही टाळाव्यात.
५. कॉर्न
कॉर्न आणि त्यापासून तयार केलेला कोणताही पदार्थ चवीला अतिशय चांगला लागतो. मात्र शुगर असणाऱ्यांसाठी ते अजिबात चांगले नाहीत. अर्धा कप कॉर्नमध्ये २१ ग्रॅम कार्बोहायड्रेटस असतात तर केवळ २ ग्रॅम फायबर असतात. त्यामुळे तुम्हाला कॉर्न आवडत असतील तर तुम्ही अतिशय कमी प्रमाणात त्याचे सेवन करायला हवे. तसेच प्रथिने आणि फायबर असणाऱ्या पदार्थांसोबत कॉर्न खायला हवेत.
६. मटार
थंडीच्या दिवसांत बाजारात मटार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. मटारची उसळ, मटार करंजी, पावभाजी, मटार टिक्की, मटार पराठा, समोसा असे एकाहून एक पदार्थ केले जातात. मात्र मटारमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा शरीराला म्हणावा तसा उपयोग नसतो तसेच त्यामुळे शुगरमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने डायबिटीस असणाऱ्यांनी मटार खाणे टाळलेले केव्हाही चांगले.