आपली तब्येत ही आपल्या आहार-विहारावर अवलंबून असते. जीवनशैली चांगली असेल तर आपल्याला जीवनशैलीशी निगडीत समस्या भेडसावत नाहीत. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे त्रास सतावतात. बीपी, डायबिटीस आणि हृदयरोग हे त्यातीलच काही. यातही आपला आहार चांगला असेल तर आपल्या निम्म्याहून अधिक समस्या कमी होतात. पण अवेळी जेवण, जंक फूड, मसालेदार आणि बाहेरचे खाणे यामुळे शरीराचे म्हणावे तसे पोषण होत नाही. त्यामुळे कालांतराने हृदयरोग किंवा बीपीसारख्या समस्या उद्भवतात.
कोणती पालेभाजी सर्वात उपयुक्त...
भाज्या शरीराला पोषण देतात. मात्र अनेकदा आपण फळभाज्या खातो पण पालेभाज्या करायचा आणि खायचा कंटाळा करतो. पण असे करणे आरोग्यासाठी तोट्याचे ठरते. पालेभाज्यांमध्ये निवडायला सोपी असलेली आणि सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे पालक. जेआरएसएम कार्डिओव्हस्क्युलर डिसिज मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार हृदयासाठी पालक ही अतिशय उपयुक्त भाजी आहे. या अहवालात केलेल्या नोंदीनुसार जगभरात लोक पालेभाज्या कमी प्रमाणात खात असल्याने त्यांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे.
पालकाच्या भाजीमुळे मिळणारे पोषण...
पालेभाज्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंटस आणि पोटॅशियम असते. तर पालकामध्ये व्हिटॅमिन ए, के आणि सी असते. तसेच त्यामध्ये लोह आणि फोलेटही असते. तसेच या घटकांमुळे शरीराच्या विविध तक्रारी दूर होण्यास मदत होते. पण नुकताच वेगवेगळ्या १३ अभ्यासांवरुन काढण्यात आलेल्या निष्कर्षावरुन पालक आणि हृदयरोग यांचे जवळचे नाते आहे. हार्ट अॅटॅक, सेरेब्रोव्हस्क्युलर हृदयरोग आणि कोरोनरी हृदयरोग यांवर नियंत्रण येऊ शकते.
पालक कसा, कधी खावा?
पालक शिजवल्यानंतर त्याचे पोषण आणखी वाढते. पालक खाण्याने हृदयाशी संबंधित त्रास १६ टक्क्यांनी कमी होतात. त्यामुळे तुमच्या आई-वडिलांपैकी कोणाला हृदयरोग, बीपी असेल तर वेळीच आहाराबाबत काळजी घ्यायला हवी. आठवड्यातून किमान ३ वेळा पालक खायला हवा. हृदयरोग किंवा बीपीशी संबंधित तक्रारी असतील तर डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या मदतीने आहारात योग्य ते बदल करायला हवेत. पालकाच्या भाजीचा कंटाळा येत असेल तर पालक भजी, पालक राईस, पालक पुऱ्या असे वेगवेगळे पदार्थ करु शकतो.