Join us   

कापूर पुजेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही वापरा! वाचा कापूराचे जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 1:32 PM

सणवार सुरु झाले की सगळ्यात आधी महत्त्व येतं ते कर्पूरआरती करण्याला. प्रत्येक पुजेची सांगता कापूर आरतीने होते. कापूराल एवढे महत्त्व का दिले आहे, हे त्याचे फायदे वाचून आपल्या लक्षात येतेच.

ठळक मुद्दे आरतीच्या वेळी कापूर जाळणे, हे केवळ कर्मकांड नसून त्यामागे मोठे विज्ञान आहे. 

कोणतीही पूजा असली तरी सगळ्यात शेवटी कापूर आरती केली जाते. जोपर्यंत कापूर आरती होऊन सगळ्या घरभर कापूराचा धूर पसरविला जात नाही, तोपर्यंत आपली पूजा काही पुर्ण होत नाही. कापूराला असणारे एवढे महत्त्व हे त्याच्यात असणाऱ्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे आहे. कापूराचे तेल करतात किंवा आणखी काही कापूराचे मोजके उपयोग आपल्याला माहिती असतात. पण प्रत्यक्षात मात्र आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टीकोनातून कापुराला अनन्य साधारण महत्त्व आहे. कापूरामध्ये ॲण्टीबॅक्टेरिअल, ॲण्टीफंगल आणि ॲण्टीइंन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जेव्हा आपण कापूर जाळतो, तेव्हा त्याच्या धुरातून शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आरतीच्या वेळी कापूर जाळणे, हे केवळ कर्मकांड नसून त्यामागे मोठे विज्ञान आहे. 

 

कापूराचे हे जबरदस्त फायदे १. कापुरामुळे होते हवा शुद्ध हवेला किंवा आसपासच्या परिसराचे नैसर्गिकपणे निर्जंतूकीकरण करण्याची क्षमता कापूरामध्ये असते. त्यामुळे कापूर पेटवल्यास हवा शुद्ध होते आणि त्याचा फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवरही चांगला परिणाम होतो. 

२. केसांच्या आरोग्यासाठी वापरा कापूर केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कापूर अतिशय पोषक आहे. केसांची वाढ खुंटली असेल, केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा खूपच केस गळत असतील, तर खोबरेल तेलात कापूराची पावडर करून टाकावी. हे तेल गरम करून घ्यावे आणि कोमट झाल्यावर डोक्याची मालिश करावी. हा प्रयोग सलग काही आठवडे केल्यास केसांचे आरोग्य सुधारते. 

 

३. डास होतात कमी पावसाळा म्हणजे डासांचा सुळसुळाट. अनेक संसर्गजन्य आजार डासांमार्फत पसरत असतात. डासांना घालविण्याचा उत्तम उपाय म्हणजे कापूर जाळणे. बंद खोलीत जर कापूर जाळला तर त्यामुळे खोलीतील डास निष्क्रिय तर होतातच शिवाय खोलीतली हवा देखील शुद्ध होते. त्यामुळे डासांना हकलून लावण्यासाठी कापूर जाळणे हा एक नैसर्गिक आणि अतिशय आरोग्यदायी उपाय आहे.

 

४. कापूराच्या तेलाने मालिश बऱ्याचदा अंग जड पडते किंवा मग स्नायूंमध्ये वेदना होतात. काही जणांना संधीवाताचा त्रास देखील असतो. अशावेळी कापूराच्या तेलाने मालिश करणे अतिशय परिणामकारक असते. खोबरेल तेलात कापूराची पावडर टाकावी. हे तेल गरम करून घ्यावे आणि कोमट झाल्यावर अंगाची मालिश करावी. स्नायूंचे दुखणे किंवा संधीवाताचा त्रास खूप कमी होतो. 

 

५. त्वचा विकारांसाठी उपयुक्त खाज येणे, पुरळ उठणे, जखम होणे, फंगल इन्फेक्शन असे कोणतेही त्वचा विकार झाले असल्यास त्यावर कापूर तेल लावावे. भाजल्यामुळे जखम झाल्यास या जखमेवर कापूर तेल सोडावे. जखमेला थंडावा मिळतो आणि आग, जळजळ कमी होते. 

 

टॅग्स : आरोग्यत्वचेची काळजीकेसांची काळजी