आपण राहतो त्या भागात पिकणारी फळं आणि भाज्या आपण जास्त प्रमाणात खायला हव्यात. याचं कारण म्हणजे त्यातूनच आपल्या शरीराचे सगळ्यात जास्त पोषण होते. आपल्या मातीत पिकणाऱ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक पोषणमूल्ये देतात. म्हणूनच आपण सफरचंद, किवी, चेरी अशी फळं खाण्यापेक्षा केळी, आंबा, सिताफळ, जांभूळ, बोरं यांसारखी लोकल फळं आवर्जून खावीत असं तज्ज्ञ सांगतात. सीताफळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारे फळ वर्षातून एकदाच थंडीच्या दिवसांत येते (health Benefits of Custard Apple Sitafal) .
थंडीच्या दिवसांत शरीराला जास्त ताकदीची आवश्यकता असते. त्यावेळी भरपूर ऊर्जा देणारे हे फळ बाजारात अतिशय स्वस्तात मिळते. सिताफळामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असंख्य घटक असून आपल्या आहारात आवर्जून सिताफळाचा समावेश करायला हवा. आपल्याला शुगर आहे, आपण लठ्ठ आहोत म्हणून अनेक जण सिताफळ खाणे टाळतात पण तसे न करता प्रत्येकाने सिताफळ खायला हवे, पाहूयात सिताफळाचे आरोग्याला होणारे फायदे.
१. हाडं मजबूत राहण्यास मदत
थंडीच्या दिवसांत आपल्याला जास्त ऊर्जा लागते. तसेच गारठ्याने हाडे दुखण्याची शक्यता असते. सिताफळात लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय चांगले असते. यामुळे थंडीत होणारा संधीवात, सांधेदुखी यांसारख्या जुन्या समस्या डोके वर काढत नाहीत.
२. मधुमेहावर उपयुक्त
सिताफळ खूप गोड असते त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांनी सिताफळ खाऊ नये असे काहींना वाटते. मात्र सिताफळात असणारे घटक डायबिटीससाठी फायदेशीर असतात. त्यामुळे इन्शुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस असेल तरी योग्य त्या प्रमाणात सिताफळ खायला हरकत नाही.
३. हृदयरोगावर रामबाण
सिताफळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच सिताफळामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी आवर्जून हे फळ खायला हवे.
४. प्रतिकारशक्ती सुधारते
सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हिटॅमिन सी दोन्हीही चांगल्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास उपयुक्त असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठीही सिताफळ खायला हवे.