Health Tips : उन्हाचा पारा वाढायला लागला शरीर थंड आणि हायड्रेट फार गरजेचं असतं. उन्ह वाढलं की, पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. पोटात उष्णता वाढते. अशात पोटात जळजळ होते. म्हणून पोट म्हणा किंवा आतून शरीर म्हणा थंड ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. आज आम्ही तुमच्यासाठी पोट थंड ठेवण्यासाठी एक आयुर्वेद उपाय घेऊन आलो आहोत. वैद्य परीक्षित शेवडे यांनी फेसबुकला एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट तशी जुनीच आहे. पण या दिवसात त्यातील माहिती तुमच्या कामात येऊ शकते.
काय आहे उपाय?
आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे उन्हाळात शरीर थंड ठेवण्यासाठी दोन उपाय सांगितले आहेत. हे दोन उपाय म्हणजे धणे जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी.
कसं बनवाल धणे-जिऱ्याचं पाणी?
धणे आणि जिऱ्याचं पाणी बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घ्या. हे एक ग्लास पाण्यात टाका. हे पाणी थोड्या वेळासाठी उकडून घ्या आणि नंतर गाळून हे पाणी प्या. रोज सकाळी हे पाणी प्यायल्यास अनेक फायदे मिळतील. काही आजार असल्यास हा उपाय करण्याआधी एकदा डॉक्टर किंवा आयुर्वेदिक एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
धणे-जिऱ्याच्या पाण्याचे फायदे
पोटातील जळजळ दूर होते
रोज धणे व जिऱ्याचं पाणी प्याल तर पोटातील जळजळ कमी करण्यास मदत मिळते. सोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. पोट थंड राहतं आणि आराम मिळतो.
लघवीची जळजळ होईल कमी
उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना लघवी करताना जळजळ होते. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. घरी धणे आणि जिऱ्याचं पाणी प्याल तर लघवी करतानाची जळजळ कमी होऊ शकते.
वाळा घातलेल्या पाण्याचे फायदे
उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक मडक्यातील पाण्यात वाळा टाकतात. यानं आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. वाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडंट असतात. या पाण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच फ्री रेडिकल्सपासून होणारं शरीराचं नुकसान टाळता येतं. वाळ्यात मोठया प्रमाणावर झिंक असल्यानं तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांची जळजळ कमी होते. तसेच उन्हाळ्यात वारंवार होणारं युटीआय इन्फेक्शन टाळण्यासाठी, तीव्र ताप कमी करण्यासाठी वाळ्याचं पाणी खूप फायदेशीर ठरतं.
काय घ्यावी काळजी?
१. रात्रभर धणे जिरे भिजत घालू नयेत. जेमतेम पाऊण एक तास भिजवून ते पाणी गाळून घ्यावे. (प्रमाण हे अनुभवानुसार ठेवावे.)
२. वाळ्याच्या जुडीचा दोरा सोडवून मग वापर करावा. आठवड्यातून एकदा जुडीला ऊन दाखवावे.
वरील दोन्ही उपायांनी सब्जासारख्या अन्य उपायांसारखा भूक कमी होणे, सर्दी होणे वगैरे दुष्परिणाम दिसत नाही हे विशेष.