धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीतील दुसरा महत्त्वाचा दिवस. बायकांची नहाणी म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते. आपल्याकडे असलेल्या संपत्तीची, धनाची या दिवशी आवर्जून पूजा केली जाते. धनाची वृद्धी व्हावी या हेतूने धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करण्याची पद्धत आहे. आपल्याकडे असलेल्या धनाची पूजा करण्याचा, ते वाढण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. या दिवशी धनाला ज्याप्रमाणे महत्त्व आहे त्याचप्रमाणे धणे आणि गूळ किंवा धणे आणि खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवण्यालाही विशेष महत्त्व आहे. भारतीय परंपरेत नैवेद्य म्हणजे त्या त्या ऋतूनुसार व्यक्तीला आवश्यक असलेला आणि साजेसा असा आहार. पाहूयात धणे आणि गूळ किंवा खडीसाखरेचे आरोग्यासाठी असलेले विशेष महत्त्व (Health Benefits of Jaggery And Coriander or Mishri khadi sakhar Dhanteras Naivedya Diwali)...
१. गूळ
गूळ हा लोहाचा उत्तम स्त्रोत मानला जातो. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता तसेच ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असल्याने दिवाळीपासून आहारात गुळाचा समावेश करण्यास सुरुवात केली जाते. गुळामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक खनिजे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
२. धणे
अॅसिडीटी, अपचन यांसाठी धणे अतिशय चांगले असतात. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होण्यासाठी आयुर्वेदात धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. आमविकार, जुलाब यांसारख्या तक्रारींवरही धणे फायदेशीर असतात. धण्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे. पीसीओडीमध्ये महिलांसाठी देखील हे मिश्रण चांगले मानले जाते.
३. खडीसाखर
नेहमीच्या साखरेपेक्षा खडीसाखर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून बहुताशवेळा खडीसाखरेचा वापर होतो. धनत्रयोदशीलाही काही जण गुळाऐवजी धणे आणि खडीसाखरेचा नैवैद्य दाखवतात. पत्री खडीसाखर शरीराला थंडावा देणे, पचनाचे विकार ते मूत्रविकार यासाठी उपयुक्त असते. धण्याचे औषधी गुण आणि खडीसारखरेचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते.