थंडीच्या दिवसांत शरीराला पोषण देणारा, ऊर्जा देणारा आहार घ्यायला हवा हे आपल्याला माहित असतं. म्हणून आपण आहारात सुकामेवा, तूप, गूळ, बाजरी, तीळ, भाज्या, फळं याचा आवर्जून समावेश करतो. हे सगळे जरी बरोबर असले तरी त्याबरोबरच आपल्या पारंपरिक पदार्थांचाही आहारात आवर्जून समावेश करायला हवा. हुलगे या कडधान्यापासून केले जाणारे कुळथाचे पीठ थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. कोकण किनारपट्टीत पिकणारे हे कडधान्य या भागात आवर्जून खाल्ले जाते. कुळथामध्ये आरोग्याला फायदेशीर अनेक घटक असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून कुळीख खायला पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात (Health Benefits of Kulith in winter season Authentic Maharashtrian food).
लोह आणि कॅल्शियमचे जास्त प्रमाण असलेले हे कडधान्य महिलां आणि लहान मुलांच्या हाडांसाठी तसेच शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी खायला सांगितले जाते. कुळथाचं गरमागरम पिठलं आणि वाफेचा भात किंवा भाकरी यासारखं चविष्ट दुसरं काहीच नाही हे या पदार्थाची चव चाखल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. थंडीच्या दिवसांत कुळथाचं पिठलं करण्याबरोबरच गरमागरम कढण, उसळ, शेंगोळे हे पदार्थ आवर्जून करायला हवेत. कुळथाला स्वत:चीच छान चव असल्याने फक्त लसणाची फोडणी दिली तरीही हे पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. पाहूयात कुळीथ खाण्याचे आरोग्याला होणारे भन्नाट फायदे...
१. दर महिन्याला होणारा मासिक पाळीचा त्रास ही महिलांमधील सामान्य समस्या आहे. पोटदुखी, पाठ आणि कंबरदुखी, पाय दुखणे यांसारख्या पाळीतील वेदना अनेकींना असह्य होतात. हा त्रास कमी व्हावा यासाठी कुळीथ अतिशय उपयुक्त ठरते.
२. कुळथामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराची समस्या असलेल्यांनी आहारात कुळथाचा जरुर वापर करावा. तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्रास नाही त्यांनीही भविष्यात हा त्रास उदभवू नये म्हणून कुळीथ खायला हवे.
३. ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे अशांनी आवर्जून कुळीथ खायला हवे. लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी कुळीथ उत्तम पर्याय आहे.
४. कुळीथामध्ये फ्लेवोनॉईड आणि पोलीफेनॉईल हे घटक मुबलक असतात. हे घटक यकृत आणि स्वादुपिंडाच्या कार्यासाठी चांगले असतात.आहारात कुळथाचा समावेश असेल तर तुमचे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. जर हे कार्य सुरळीत झाले नाही तर शरीरातील पित्त, कफ आणि वात दोष वाढतात आणि आजारपणाला सुरूवात होते.
५. युरीन इन्फेक्शन, मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्येही कुळथाने आराम मिळतो. लघवीसाठी सतत जळजळ, आग होत असेल तर कुळथाचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे लघवी साफ होण्यास मदत होते. लहान मुलांनाही कुळथाचे कढण नियमित द्यावे.