आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने हमखास पंचामृत बनवलं जातं. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पूजेनंतरचा प्रसाद म्हणून रव्याचा शिरा व पंचामृत दिले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिलं जातं. पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचं मिश्रण होय. प्राचीन काळापासून आपल्याकडे पंचामृताला फार महत्व आहे. पंचामृत (Panchamrit) हे दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवले जाते. पंचामृत हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करणारे जल म्हणूनच याला पंचामृत असे म्हणतात. दूध, दही, तूप, साखर, साजूक तूप, मध या पाच पदार्थांच्या मिश्रणातून पंचामृत तयार होते. या पंचामृतामध्ये जिवाणूजन्य आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता असते. त्यामुळे पावसाळी वातावरणातील जिवाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता शरीरात पंचामृतामुळे निर्माण होते(Health Benefits Of Panchamrit).
सध्या सगळीकडे श्रावण महिन्यातील वेगवेगळे सणवार आनंदाने साजरे केले जात आहेत. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणावाराला काहीतरी गोडधोड पदार्थाच्या सोबतीने पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवतो. कोणतीही पूजा, नैवेद्य, प्रसाद हा पंचामृताशिवाय अपूर्णच मानला जातो. यासाठी आपल्याकडे कोणत्याही धार्मिक विधीत पंचामृत हे अतिशय महत्वाचे असते. नैवेद्यासाठी नेहमी बनवले जाणारे हे पंचामृत आणि या पंचामृतातील मुख्य ५ पदार्थ खाण्याने आपल्या आरोग्याला त्याचे नेमके कोणते फायदे होतात ते पाहूयात (Why You Should Drink Panchamrit).
पंचामृतातील मुख्य ५ पदार्थांचे आरोग्यदायी फायदे ...
१. दही :- दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे जिवाणू असतात. त्यामुळे आपल्या आतड्यांची कार्यक्षमता वाढते. अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्यांसाठी दही फायदेशीर ठरते. पंचामृतात दही असतं जे पचनक्रियेसाठी उत्तम असेल. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी पंचामृत नक्की प्यावे.
२. दूध :- दुधामध्ये फार मोठ्या प्रमाणांत कॅल्शियम असते. यामुळे शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी दूध फायदेशीर ठरते.
३. मध :- मधामध्ये अँटीऑक्सीडंटस असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. फक्त शरीर मजबूत असून काहीच उपयोग होत नाही, याउलट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते, यासाठी मध खाणे गरजेचे असते.
४. साखर :- साखर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. साखरेमुळे पंचामृतातील उष्मांक वाढतो.
५. साजूक तूप :- साजूक तुपामध्ये 'ए', 'बी', 'इ', 'के' अशी मेद तयार करणारी जीवनसत्वे असतात.
काहीतरी गोड खावेसे वाटते, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते, १ सोपी रेसिपी - गोड आणि पौष्टीक...
पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...
पंचामृत बनवाताना या गोष्टींची काळजी घ्या...
१. नेहमी ताजं बनवलेलंच पंचामृत प्यावं. कारण हे थोड्या वेळासाठीच चांगलं राहतं.
२. पंचामृतात दही घातलं जातं जे काही काळाने आंबट होतं त्यामुळे याचा वासही बदलतो. त्यामुळे पंचामृत जास्त दिवस ठेवू नये.
३. आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाच प्रमाण सम नसावं. त्यामुळे पंचामृत बनवताना याची काळजी नक्की घ्या.
४. पंचामृत बनवण्यासाठी नेहमी स्टेनलेस स्टील, सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा. पूर्वीच्या काळी पंचामृताच्या जास्तीच्या फायद्यांसाठी ते चांदीच्या वाडग्यात बनवले जात असे.
त्यामुळे पंचामृत फक्त प्रसाद म्हणून नाहीतर दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यासही तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.