Join us   

Health Benefits of Sabja Seeds :....म्हणून उन्हाळ्यात सब्जा खायला हवा, ५ भन्नाट फायदे, तब्येत गारेगार ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 12:37 PM

Health Benefits of Sabja Seeds : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. पाहूयात सब्जा खाण्याचे फायदे...

ठळक मुद्दे सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.यामध्ये असणाऱ्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळेही वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते. 

उन्हाळा आला की आपण सगळेच वेगवेगळी सरबते पितो. यामध्ये सब्जा आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि त्याचा आहारात समावेश असायला हवा असे आपण अनेकदा ऐकतो. पण सब्जा खाण्याचे किंवा पिण्याचे नेमके कोणते फायदे असतात हे आपल्याला माहित नसतात. पण हा सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. सरबत, फालुदा, कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये सब्जा खाता येतो. (Health Benefits of Sabja Seeds) दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. सब्जामध्ये असणारे अँटी- ऑक्सिडंटस आपल्या शरीराचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात. पाहूयात सब्जा खाण्याचे फायदे...

(Image : Google)

१. पचन चांगले होण्यास मदत 

सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकता. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत होते. तब्येत चांगली राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते, सब्जामुळे हे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. 

२. हृदयविकारावर गुणकारी 

तब्येत चांगली ठेवायची असेल तर हृदयाचं आरोग्य निरोगी राहणं आवश्यक आहे. सब्जामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असतात. या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पाण्यात सब्जा घालून या पेयाचे नियमित सेवन केल्यास यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर राहण्यास मदत होते. 

३. त्वचेसाठी फायदेशीर 

केवळ आरोग्याच्या तक्रारींसाठीच नाही तर त्वचेसाठीही सब्जा चांगला असतो. हवेतील प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होत असतो. प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. मात्र त्वचेच्या समस्या दूर कऱण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज केल्यास त्वचा चांगली होण्यास मदत होते. 

(Image : Google)

४. वजन नियंत्रणात राहण्यास उपयुक्त

सब्जामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. पाण्यामध्ये सब्जा मिक्स केल्यास या बिया अधिकाधिक पाणी शोषून घेतात. सब्जायुक्त पाणी प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज जात नाही. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्यावर नियंत्रण येते. तसेच यामध्ये असणाऱ्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळेही वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते. 

५. बद्धकोष्ठता दूर होण्यास फायदेशीर 

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करतो आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले राहण्यास सब्जाचा फायदा होतो. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न