Join us   

थंडीत सतत सर्दी-खोकल्याचा त्रास, कॉन्स्टीपेशनही होते? आहारात घ्या फक्त १ पदार्थ, त्रास होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 1:37 PM

Health Care Diet Tips For Winter : हवेत गारठा असल्याने सर्दीमुळे कधी नाक गळतं तर कधी खोकून खोकून जीव मेटाकुटीला येतो. अशावेळी आपण आहारात आवर्जून काही बदल करतो.

ठळक मुद्दे आयुर्वेदात शुद्ध गायीच्या तूपाचे थेंब नाकात घालण्याची पद्धत सांगितली आहे जी सर्दी-कफ दूर होण्यास फायदेशीर ठरते. ऋतूनुसार आहार-वाहारात बदल करणे आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर असते.

थंडीच्या दिवसांत आपल्याला हमखास होणाऱ्या समस्या म्हणजे कॉन्स्टीपेशन, सर्दी-ताप, खोकला, त्वचेचा कोरडेपणा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या समस्यांनी हैराण होतात. सकाळी पोट नीट साफ झालं नाही की दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं. इतकंच नाही तर हवेत गारठा असल्याने सर्दीमुळे कधी नाक गळतं तर कधी खोकून खोकून जीव मेटाकुटीला येतो. अशावेळी आपण आहारात आवर्जून काही बदल करतो. शरीराला गरम ठेवणारे आणि ऊर्जा-पोषण देणारे पदार्थ आपण थंडीच्या दिवसांत आवर्जून खातो. यामध्ये बाजरी, तीळ, सुकामेवा, गूळ, फळं, भाज्या या गोष्टींचा समावेश असतो. इतकंच नाही तर या दिवसांत आवर्जून खायला हवी अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूप. थंडीच्या दिवसांत तूप वंगणासारखे काम करते आणि आरोग्याच्या इतर समस्यांसाठीही अतिशय फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा तूप खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे सांगतात, ते कोणते पाहूया (Health Care Diet Tips For Winter)...

(Image : Google)

१. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत

थंडीच्या दिवसांत शरीराला आतून ऊर्जा देण्यासाठी तूप अतिशय उपयुक्त ठरते. तूप पदार्थांवर घेण्यासाठीच नाही तर काही पदार्थ तूपातच केलेलेही खूप छान लागतात आणि आरोग्यासाठी चांगले असतात. 

२. पचनक्रियेसाठी आणि आतड्यांसाठी फायदेशीर

आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी तूप महत्त्वाची भूमिका बजावते. जेवणात पोळी खाताना त्यावर एक चमचा तूप घालून खाल्ल्यास केवळ पोळी नरम होण्यासाठीच नाही तर बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी याचा उपयोग होतो. 

(Image : Google)

३. सर्दी-खोकला दूर होण्यास उपयुक्त

तूपामध्ये अँटीइन्फ्लमेटरी आणि अँटी बॅक्टेरीयल असे दोन्ही गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी- खोकला अशाप्रकारच्या इन्फेक्शनपासून दूर राहण्यास याची चांगली मदत होते. आयुर्वेदात शुद्ध गायीच्या तूपाचे थेंब नाकात घालण्याची पद्धत सांगितली आहे जी सर्दी-कफ दूर होण्यास फायदेशीर ठरते.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीआहार योजना