Join us   

Health Care Tips : आई-वडिलांना डायबिटीस आहे? मग तुम्ही तरुण असतानाच घ्या ४ गोष्टींची काळजी, तरच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 11:12 AM

Health Care Tips : आपण सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेतल्यास डायबिटीसच्या समस्येपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. आता त्यासाठी नेमकी कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते पाहूया...

ठळक मुद्दे आपले वजन अचानक कमी होत असेल, सतत चिडचिड होत असेल. प्रमाणापेक्षा जास्त थकवा येत असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवेव्यसनाधीनता, रात्री जागरण करणे अशा जीवनशैलीविषयक गोष्टी टाळायला हव्यात. 

डायबिटीस ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे. आपण डायबिटीसला आजार म्हणत नसलो तरी ती जीवनशैलीविषयक समस्या आहे हे नक्की. डायबिटीस हा सायलंट किलरसारखा असल्याने एकदा डायबिटीस झाला पथ्य, औषधोपचार आणि जीवनशैली यांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. आई-वडिलांना डायबिटीस आहे हे समजल्यानंतर आपण कोणत्याही वयात असलो तरी काळजी घ्यायला हवी. कारण डायबिटीस ही बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक समस्या असल्याचे गेल्या काही वर्षातील अभ्यासातून समोर आले आहे. आता आई-वडिलांना डायबिटीस आहे म्हणजे आपल्यालाही तो होणारच असे नाही. पण आपण सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेतल्यास डायबिटीसच्या समस्येपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. आता त्यासाठी नेमकी कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते पाहूया...

(Image : Google)

१. आहार 

आहार हा आपल्या बहुतांश समस्यांमधील एक महत्त्वाचा घटक असतो. आपला आहार उत्तम, सात्विक आणि ताजा असेल तर आपण आरोग्याच्या बऱ्याच समस्यांपासून दूर राहू शकतो. सतत गोड खाणे, पॅकेट फूडचा वाढता वापर, जंक फूडचे अतिसेवन यांसारख्या गोष्टींमुळे शरीरात अनावश्यक घटक जमा होतात. याचे रुपांतर म्हणजे लठ्ठपणा, रक्तातील साखरेची वाढलेली पातळी असे परिणाम दिसून येतात. इतकेच नाही तर जेवणाच्या चुकीच्या वेळा, दोन जेवणांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी अंतर असणे, एकावेळी प्रमाणापेक्षा जास्त खाणे यांसारख्या चुकीच्या सवयींमुळेही रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहाराबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

२. व्यायाम 

अनेकदा आपल्याला रोजच्या धावपळीमुळे व्यायामाला वेळ मिळत नाही. अशावेळी आठवड्यातील दोन दिवस आणि वीकेंडचे २ दिवस असा ४ दिवस तरी ठरवून काही ना काहीतरी व्यायाम करायला हवा. आपण खात असलेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर ते पदार्थ शरीरात साठतात आणि त्याचे चुकीचे परीणाम शरीरावर होतात. त्यामुळे चालणे, सूर्यनमस्कार, योगा, स्ट्रेचिंग असा जो जमेल तो व्यायाम आठवडयातून ३ ते ४ दिवस तर नक्कीच करायला हवा. यामुळे आपले शरीर आणि शरीराचे कार्य चांगले राहण्यास मदत होईल. यामुळे डायबिटीससारख्या समस्येपासूनही आपण दूर राहण्याची शक्यता आहे.

३. नियमित तपासण्या 

सध्या अतिशय कमी वयात डायबिटीस, बीपी, कोलेस्टेरॉल हे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या घरात डायबिटीसचा इतिहास असेल तर आपण साधारण ३५ वर्षे वयानंतर दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तरी वैद्यकीय तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हव्यात. यामुळे आपल्याला चुकून डायबिटीसची समस्या असेल तर वेळीच ती समजण्यास आणि त्यावर योग्य ते उपाय करण्यास मदत होते. त्यामुळे ठराविक वयानंतर नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे. 

(Image : Google)

४. इतर काळजी 

आपले वजन अचानक कमी होत असेल, सतत चिडचिड होत असेल. प्रमाणापेक्षा जास्त थकवा येत असेल तर या गोष्टींकडे लक्ष देऊन योग्य त्या तपासण्या करायला हव्या. डायबिटीसची ही सुरुवातीची लक्षणे असून अनेकांना हे लक्षातच येत नाही. मग इतर कोणत्या कारणाने तपासण्या केल्यानंतर आपल्याला डायिबिटीस असल्याचे निदान होते. मात्र तेव्हा बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा थोडी वेगळी लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. याबरोबरच व्यसनाधीनता, रात्री जागरण करणे अशा जीवनशैलीविषयक गोष्टी टाळायला हव्यात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह