डॉ. अविनाश भोंडवे
गणपतीच्या दिवसांत दडी मारुन बसलेला पाऊस विसर्जनाच्या दिवशीपासून अचानक सुरू झाला आहे. त्यानंतर तर राज्याच्या बऱ्याच भागात तुफानी पावसाला सुरुवात झाली. पाऊस आला की तो गारवा घेऊन येतो हे जरी खरे असले तरी त्यासोबत होणारे डास आणि येणारी आजारपणं घरोघरी पाहायला मिळतात. पावसाळ्यात कधी दमट तर कधी उष्ण हवा असते. तर कधी अचानक हवेत गारवा येतो. हवामान, डास, ओलेपणा यांमुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात. हे आजार कोणते त्याबाबत समजून घेऊया (health problems related to rainy season doctors suggestion infectious diseases)...
१. श्वसनसंस्थेचे विषाणूजन्य आजार- इंफ्लुएन्झा, न्युमोनिया, मेनिनजायटिस (मेंदूज्वर), स्वाईनफ्लू, कोरोना अशा आजारांच्या विषाणूंचे प्रमाण वाढते. या आजारात उद्भवणाऱ्या सर्दी, शिंका, खोकल्यामधून हे विषाणू पसरतात आणि त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या इतर व्यक्तींच्या श्वासामधून त्यांच्या शरीरात जाऊन त्यांनाही या आजारांची लागण होते. तसेच दमा, जुना खोकला (ब्रॉन्कायटिस) असे आजार बळावतात.
२. डासांमधून पसरणारे आजार- पावसाळ्यात सर्वत्र जमा होणाऱ्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. यामध्ये जास्त दिवस साचलेल्या दूषित पाण्यात अँनाफेलिस प्रजातीच्या दासांची पैदास वाढते. या डासांच्या चाव्यामधून मलेरिया होतो आणि त्याचा प्रसारही होतो. पावसाळ्यात घरामधील कुंड्या, फुलदाण्या, टेरेसवर ठेवलेले अडगळीचे सामान, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यांच्यामध्ये असलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये एडिस इजिप्ती या डासांची पैदास होते. या डासांच्या चाव्यामधून डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका या आजारांचा प्रसार होतो.
३. माश्यांपासून पसरणारे आजार- पावसाळ्यात ओलेपणा, साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे माश्या मोठ्या प्रमाणात वाढतात. माश्या बसलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, टायफॉईड अशा आजारांचा प्रसार होतो.
४. पावसाचे साचलेले पाणी- रस्त्यावर किंवा अन्यत्र साचलेल्या पाण्यात उंदीर, घोडे, गायी, बैल, म्हशी अशा प्राण्यांचे मूत्र पसरू शकते. या मूत्रामधून लेप्टोस्पायरोसिस नावाच्या आजाराचे विषाणू असतात. त्यामुळे अशा साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या व्यक्तीच्या पायावर कोणत्याही कारणामुळे जखम झालेली असेल, तर त्या जखमेमधून हे विषाणू त्याच्या शरीरात जातात आणि त्यांना लेप्टोस्पायरोसिसची लागण होते.
५. डोळे येणे- पावसाळ्यामध्ये अनेकदा कंजन्क्टिव्हायटिस या आजाराचे विषाणू पसरून डोळ्यांची साथ येते. श्वसनसंस्थेमधून पसरणाऱ्या विषाणूजन्य सर्दीसारख्या आजारात देखील डोळे येणे, डोळे चुरचुरणे असे विकार होतात.
६. बुरशीजन्य आजार- पावसाळ्यात भिजल्यावर अंग कोरडे न केल्यास किंवा ओले कपडे अंगावर वाळवल्यास, पावसाळ्यामुळे ण वाळलेली अर्धवट ओळी अंतर्वस्त्रे घातल्यास गजकर्णासारखे त्वचेचे बुरशीजन्य (फंगल) आजार होतात.पावसाळ्यात हातपाय सतत ओले राहिल्यास किंवा ते कोरडे न केल्यास हातापायांच्या बेचक्यांमध्येसुद्धा चिखल्यांसारखे त्वचेचे बुरशीजन्य आजार उद्भवतात.
आपल्या कुटुंबात किंवा आजुबाजूला कोणालाही अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करावेत. घरगुती उपाय करणे किंवा समस्या अंगावर काढल्याने त्रास वाढण्याचीच शक्यता जास्त असते.
(लेखक जनरल फिजिशियन असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत)