Join us   

आतले कपडे वाळत घालायला जागाच नाही, लाज वाटते? सावधान, गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 7:52 PM

आतले कपडे बाहेर वाळत घालण्यात कशाची लाज? आजार टाळायचे असतील तर एवढी काळजी घ्याच..

ठळक मुद्दे बाथरूममध्ये वाळत घातलेले आतले कपडे नीट वाळत नाहीत. अनेकदा अर्धवट ओले कपडे घालावे लागतात. यामुळे मग इन्फेक्शन होते आणि नको नको ते बायकांचे आजार मागे लागतात.

बहुतांश घरांमध्ये दिसून येणारी एक कॉमन गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये वाळत घातलेले बायकांचे आतले कपडे. वर्षानुवर्षांच्या प्रथांप्रमाणे आजही बायकांच्या आतल्या गोष्टी, आतले कपडे याबद्दल बोलणे निषिद्ध मानले गेले आहे. आपले आतले कपडे कुणाच्याच नजरेस पडू नयेत, याबाबत बायका खूपच जागरूक असतात. आतले कपडे कुणी पाहिले म्हणजे जणू आपल्या हातून मोठे पापच घडले, अशी भावनाही अनेकींची असते. पण मैत्रिणींनो आतल्या कपड्यांविषयी असणारा हा न्यूनगंड थोडा बाजूला ठेवा आणि निदान पावसाळ्याच्या दिवसात तरी आतल्या कपड्यांना स्वच्छ सुर्यप्रकाशात वाळत घाला.

 

सकाळी उठून आंघोळ केली की तिथेच बाथरूममध्ये दाराच्या मागे आपले आतले कपडे वाळत घालायचे आणि मगच बाथरूममधून बाहेर यायचे, ही बहुसंख्य बायकांची सवय. यातही घरातली पुरूष माणसं आंघोळीला जाणार, त्यांना आपले आतले कपडे दिसणार याची धाकधूक. म्हणून मग एकतर कपडे बाथरूममध्ये वाळत टाकायचे आणि त्यावर पुन्हा ते कुणाला दिसू नयेत म्हणून एखादा टॉवेल किंवा एखादा कपडा टाकायचा, असे पुष्कळ महिला करतात.

वर्षानुवर्षांपासून अनेक घरांमध्ये हीच प्रथा चालत आली आहे. आपल्या मुलीलाही आई असंच शिकवते. बाथरूम ही जागा कायम पाण्याचा वापर होणारी असल्यामुळे अतिशय दमट असते. कधीकधी तर योग्य व्हेंटिलेशन नसल्यामुळे अनेक बाथरूममध्ये स्वच्छ सुर्यप्रकाश आणि मोकळी हवा देखील येत नाही. अशा कुबट, कोंदट जागेत अडचणीत कपडे वाळत घालण्याचा सोस बायकांनी टाळावा.

बाथरूममध्ये वाळत घातलेले आतले कपडे नीट वाळत नाहीत. अनेकदा अर्धवट ओले कपडे घालावे लागतात. यामुळे मग इन्फेक्शन होते आणि नको नको ते बायकांचे आजार मागे लागतात. म्हणून बायकांनी त्यांचे आतले कपडे स्वच्छ सुर्यप्रकाशात वाळत घालणे खूपच आवश्यक आहे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात.

पावसाळ्याच्या दिवसांत तर जंतुसंसर्ग आणि त्वचाविकार यांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. सगळीकडे दमट वातावरण असते. काही काही भागांमध्ये तर स्वच्छ सुर्यप्रकाशही पडत नाही. अशावेळी मोकळ्या हवेत वाळत घातलेले कपडे वाळण्याचीही जिथे बोंब आहे, तिथे बाथरूममधले कपडे कितपत वाळणार हा प्रश्नच असतो. त्यामुळे पावसाळ्यात तरी मोकळ्या हवेत तुमचे कपडे वाळत टाका. खूपच संकोच वाटत असल्यास कपड्यांवर एखादा ओढणीसारखा पातळ कपडा पसरवा. त्यामुळे कपडे मोकळ्या हवेत व्यवस्थित सुकतील आणि आतल्या कपड्यांद्वारे जंतूसंसर्ग होण्याचा धोका कमी होईल. 

 

टॅग्स : आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स