ब्लड प्रेशर ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयस्कर लोकांना किंवा इतर कोणते त्रास असणाऱ्यांनाच ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब वाढण्याचा किंवा कमी होण्याचा त्रास असायचा. पण आता मात्र अगदी कमी वयातील लोकांना, तुलनेने सुदृढ दिसणाऱ्यांना ब्लड प्रेशरचा त्रास झाल्याचे दिसते. वाढते ताणतणाव, अनियमित जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव यांमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवते (Bp measurement). आता ब्लड प्रेशर आहे म्हटल्यावर त्याच्याशी संबंधित उपचार घेण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर औषधोपचाराने ही समस्या नियंत्रणात राहण्यासाठी काही औषधे देतात. आपण ही औषधे नियमित घेत असलो तरीही नियमितपणे आपला रक्तदाब तपासणे गरजेचे आहे (Health Tips) .
हल्ली कुटुंबातील जास्त व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास असेल किंवा ज्येष्ठ व्यक्तींना सतत रक्तदाब तपासण्यासाठी क्लिनिकमध्ये नेणे शक्य नसेल तर रक्तदाब मोजण्याचे मशीन विकत घेतले जाते. ठराविक कालावधीने किंवा रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीला अस्वस्थ वाटल्यास घरच्या घरी रक्तदाब तपासला जातो. एकाएकी तब्येत बिघडू नये यासाठी हे मशीन घरात असलेले चांगले असले तरी त्याने मोजलेला रक्तदाब कितपत योग्य असतो हा प्रश्न आहे. व्यक्तीला घाम आल्यासारखे वाटल्यास, घाबरल्यासारखे झाल्यास मशीनने घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रक्तदाब मोजता येतो. पण अशाप्रकारे घरी मशीनवर रक्तदाब मोजणे योग्य की क्लिनिकमध्ये जाऊन तज्ज्ञांच्या मदतीने, त्यांच्या समोर रक्तदाब मोजणे असे प्रश्न आपल्याला पडू शकतात.
तर वॉशिंग्टन येथे झालेल्या अभ्यासात घरच्या घरी ब्लड प्रेशर मोजल्यास त्यातून मिळणारे निदान जास्त योग्य असल्याचे म्हटले जात आहे. केसर पर्मनंट इनव्हेस्टीगेटरने याबाबतचा अभ्यास केला असून घरच्या घरी रक्तदाब तपासणे कधीही जास्त योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी जवळपास ५०० जणांवर २ वर्षे प्रयोग केला आणि त्यानंतर आपले म्हणणे मांडले आहे. मात्र सतत उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याचा तुमचे हृदय, किडणी, मेंदू यांवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच याबाबतची योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना केलेल्या केव्हाही चांगल्या असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे असले तरी आपण घेत असलेले मशीन चांगल्या कंपनीचे असावे, तसेच रक्तदाब मोजण्याबाबत आपल्याला योग्य ती माहिती असावी आणि ठराविक कालावधीने याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जावा असेही त्यांचे म्हणणे आहे.