Join us   

Health Tips : सतत गॅसेस आणि अॅसिडीटी होते? खाल्लेलं अन्न नीट पचत नाही? ३ सोपे उपाय, अॅसिडिटीला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 3:43 PM

Health Tips :सतत करपट ढेकर येतात नाहीतर अॅसिडीटीने डोकं जड होतं. यावर औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी सोपे उपाय केले तर....पाहूयात असेच काही सोपे उपाय..

ठळक मुद्दे किचनमधल्या काही गोष्टी निश्चितच उपयुक्त ठरतात (Home Remedies) . पाहूया पचनाच्या तक्रारींवर असेच सोपे उपाय... संत्री खाल्ल्याने किंवा संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने पचनाशी निगडीत तक्रारी दूर होतात. 

आपण दिवसातील ३ ते ४ वेळेला नियमितपणे खात असतो. पण हे खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचतेच असे नाही. (Health Tips) कधी बैठी जीवनशैली तर कधी व्यायामाचा अभाव यांमुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. न पचलेले अन्न शरीर एकतर बाहेर टाकते किंवा ते शरीरात एकप्रकारे कुजते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर त्यामुळे अपचनाच्या तक्रारी (Digational Problems) उद्भवतात. कधी सतत येणारे ढेकर तर कधी गॅसेस आपला पिच्छा पुरवतात. इतकेच नाही तर अॅसिडीटी तर अगदी आपली पाठच सोडत नाही. एकदा अॅसिडीटी झाली की होणारी डोकेदुखी, मळमळ, उलट्या यांमुळे आपण पार हैराण होऊन जातो. अशा तक्रारी कमीअधिक फरकाने घराघरांत पाहायला मिळतात. मग कधी काही घरगुती उपाय करुन तर कधी आपल्याला माहित असलेली औषधे घेऊन यावर आराम मिळवला जातो. इतकेच नाही तर पचनाच्या तक्रारी जास्त झाल्या तर डॉक्टरांकडे जाऊनही औषधे घेतली जातात. पण या सगळ्यावर वेळीच उपाय हवा असेल तर किचनमधल्या काही गोष्टी निश्चितच उपयुक्त ठरतात (Home Remedies) . पाहूया पचनाच्या तक्रारींवर असेच सोपे उपाय...

(Image : Google)

१. लिंबू 

लिंबू आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असलेले हे लिंबू आरोग्याच्या अनेक तक्रारींवरील रामबाण उपाय आहे. लिंबामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, खनिजे असे इतरही अनेक उपयुक्त घटक असतात. लिंबामध्ये असणाऱ्या पेक्टीन नावाच्या फायबरमुळे पचन चांगले होण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाचे सरबत किंवा भाजी, कोशिंबीरीवर लिंबू पिळून घेतल्यास त्याचा फायदा होतो. 

२. आलं 

आलं आपण साधारणपणे पदार्थाला स्वाद येण्यासाठी वापरतो. पण आल्यातील पाचक गुणधर्म आरोग्याच्या तक्रारींवरील रामबाण उपाय आहे. आल्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस पोटाच्या आणि पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आलं खाल्ल्यामुळे पोटात होणारे गॅसेस कमी होतात. आलं ठेचून त्यामध्ये गूळ किंवा हिंग, मीठ घालून खाल्ले तरी चालते किंवा चहामध्ये नियमित आलं घातल्यास त्याचा अतिशय चांगला परिणाम दिसून येतो. 

(Image : Google)

३. संत्रे

संत्र्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठता किंवा अॅसिडीटी असा त्रास असेल त्यांनी आहारात नियमित संत्र्याचा वापर करायला हवा. संत्र्यामुळे आपली प्रतिकारशक्ती तर वाढतेच पण संत्री खाल्ल्याने किंवा संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने पचनाशी निगडीत तक्रारी दूर होतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स