रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का? त्याबद्दल मानस शास्त्रज्ञांकडून सविस्तर जाणून घेऊ.
राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल तर निदान भावनानांवर संयम ठेवायलाच हवा. मुद्दा मांडायच्या वेळी जर आपण रडत बसलो तर ती आपली हतबदलता ठरू शकते. हे कशाने होते व त्यावर उपाय काय ते पाहू.
मानसशास्त्रज्ञ सांगतात, तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या शरीरात अनेक हार्मोन्समध्ये बदल होतो. त्यामुळे आपला चेहरा लाल होतो. अंगाचा थरकाप होतो, घाम येतो, माणूस अस्वस्थ होतो. अशा वेळी अश्रूंचा बांध फुटणे आणि त्या अवस्थेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी निसर्गाने केलेली ती एक प्रक्रिया आहे, जी आपसुख घडते . त्यामागे पुढील कारणं असू शकतात-
सामाजिक अपेक्षा: रागाच्या भरात अनेक गोष्टी बोलायच्या असूनही सामाजिक बंधनं पाळावी लागतात, जिथे शब्दांना मर्यादा येते तिथे अश्रूंना मार्ग मिळतो आणि आपल्याला रडू येते.
भावनिक तीव्रता: दुःख असो वा आनंद, आपल्या शरीराला जेव्हा ती तीव्रता सहन होत नाही तेव्हा आपोआप डोळे पाणावतात. तीव्रता जास्त असेल तर खूप रडू येते. शब्दाची जागा अश्रू घेतात.
अन्योन्य प्रतिक्रिया : रागात रडणे हा एक प्रकारचा संवाद आहे जो आपण आपल्या सभोवतालच्या लोकांशी करतो. त्यातून आपली हतबलता समोर येते, मात्र आपल्याकडील मुद्द्यांची तीव्रता समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते.
रागावल्यावर रडणे सामान्य आहे का?
होय, अगदी. रागाच्या भरात रडणे ही केवळ एक सामान्य प्रतिक्रियाच नाही तर ती तुमच्यासाठी अनेक प्रकारे चांगलीही ठरू शकते. रडण्याने आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन सारखी रसायने बाहेर पडतात. हे तुमचे हृदयाचे ठोके कमी करू शकतात आणि तुमचे मन शांत करू शकतात.
आपण या भावनांवर नियंत्रण कसे ठेवू शकतो?
चिथावणी दिल्यावर तुमच्या खऱ्या भावनांशी प्रतिक्रिया देणे सामान्य असले तरी, वाद किंवा रागाच्या वेळी न रडता मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही दुर्बल झाला आहात हे समोरच्यांच्या लक्षात येणार नाही.
स्वत:ची जाणीव महत्त्वाची आहे
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथम आपले ट्रिगर ओळखणे. आपल्या सभोवतालची परिस्थिती, लोक आणि विचार तीव्र भावनांना उत्तेजन देतात. यामुळे आपण रागावतो आणि रडतो. तुमचे ते ट्रिगर ओळखण्याचा प्रयत्न करा आणि तो क्षण सावरायचा आहे या भावनेने सतर्क राहा.
दीर्घ श्वास घ्या आणि आराम करा
जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी परिस्थिती वाटते की तुम्हाला राग येतो तेव्हा दीर्घ श्वास घ्या. हळू आणि खोल श्वासोच्छ्वास भावनांचे नियमन करण्यास आणि शारीरिक उत्तेजना कमी करण्यास मदत करू शकतात.
स्नायूंच्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा
तणावग्रस्त स्नायूंमुळे तुम्हाला सहज राग येतो, म्हणून त्यांना आराम करण्यासाठी तंत्र शिका. भावनिक प्रतिक्रिया शांत करण्यात मदत करणारे व्यायाम वापरून पहा.