Join us   

Health Tips : बळकट हाडांसाठी आहारात हवेतच ९ पदार्थ, नियमित खा-हाडं सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 5:09 PM

Health Tips : बळकट हाडे ही आपली आयुष्यभरासाठीची संपत्ती असते, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार आणि उत्तम जीवनशैली हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्दे बळकट हाडे ही आपली आयुष्यभरासाठीची संपत्ती असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  चहा आणि कॉफीमध्ये असणारे कॅफीनही हाडांच्या बळकटपणासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे चहा-कॉफी प्रमाणात घेतलेले केव्हाही चांगले. 

आपलं शरीर ज्या हाडांवर बांधलेले आहे ती हाडे बळकट असतील तरच आपण हालचाल आणि इतर क्रिया व्यवस्थितपणे करु शकतो. एकदा हाडं दुखायला लागली किंवा हाडांच्या तक्रारीमुळे शरीराच्या एखाद्या हालचालीवर बंधनं आली की आपल्याला या हाडांची किंमत कळते. व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि सततची स्क्रीनसमोर बसण्याची चुकीची पदधत यांमुळे आणि इतरही काही कारणांनी हाड़े दुखण्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. हल्ली वयस्कर लोकांबरोबरच तरुणांनाही हा त्रास उद्भत असल्याचे पाहायला मिळते. कधी आहारातून पुरेसे पोषण मिळत नसल्याने तर कधी हाडांची झीज झाल्याने, कधी शरीराला व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२  यांची कमतरता झाल्याने हाडांचे दुखणे उद्भवते(Bones Health) . 

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ भक्ती कपूर यांच्या म्हणण्यानुसार, संतुलित आहार आणि जीवनशैली चांगली असेल तर हाडे बळकट राहू शकतात. याबद्दल त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये बळकट हाडांसाठी आहारात असायलाच हवेत अशा पदार्थांची यादी त्यांनी दिली आहे. त्या म्हणतात, कमी वयापासून उत्तम आहार घेतल्यास वय झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो. याविषयी आहाराबाबतचे काही महत्त्वाचे सल्लेही त्या देतात (Health Tips) . बळकट हाडे ही आपली आयुष्यभरासाठीची संपत्ती असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

१. हल्ली आहारात सिरीयल्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामध्ये कॅल्शियम असल्याचे म्हटले जाते. पण त्यात असणारे फायटीक अॅसिड आरोग्यासाठी चांगले नाही. 

२. जास्त प्रमाणात मांसाहार करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण जास्त मांसाहारामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी घटते. 

३. मीठाचा जास्त प्रमाणात वापर करणे किंवा मीठ असणारे पॅकेट फूड सतत खाणे हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. मीठामुळे शरीरातील कॅल्शियमचे उत्सर्जन होते. 

४. अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन आरोग्याच्यादृष्टीने चांगले नसते त्याचप्रमाणे हाडांसाठीही चांगले नसते. अल्कोहोलच्या सेवनामुळे हाडे ठिसूळ होतात. 

५. चहा आणि कॉफीमध्ये असणारे कॅफीनही हाडांच्या बळकटपणासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे चहा-कॉफी प्रमाणात घेतलेले केव्हाही चांगले. 

हाडांच्या बळकटीसाठी आहारात असायलाच हवेत असे पदार्थ 

१. बदाम २. दही ३. संत्री ४. पालेभाज्या ५. ऑलिव्ह ऑईल ६. तीळ ७. मासे ८. केळी ९. सोयाबिन

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल