जगभरात हृदयाच्या आजारांमुळे लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. मागच्या अनेक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार प्लांट बेस्ड डाएट हृदयाशी निगडीत आजार टाळण्याासाठी फायदेशीर ठरतो. अलिकडेच संशोधकांनी १०० पेक्षा जास्त अभ्यासांची समिक्षा केली. समोर आलेल्या माहितीनुसार प्लांट फूडचा हृदयावर चांगला परिणाम होतो. आजारांपासून बचाव होण्याव्यतिरिक्त मृत्यूचा धोकाही कमी करता येऊ शकतो.
हे मेटा विश्लेषण कार्डिओवास्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यात इटलीच्या नेपल्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हृदय रोगाची जोखिम आणि आहार पॅटर्न यांच्यातील संबंधांचा शोध लावला होता. संशोधकांना दिसून आले की जास्तीत जास्त भाज्यांचे सेवन आणि कमी प्रमाणात मासाहार करणं मृत्यूचा धोका कमी करते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही कमी प्रमाणात मासाहार करता आणि हिरव्या भाज्या, टोमॅटो खाता तेव्हा हृदयरोगाचा धोका कमी होतो. टोमॅटोमधील लायकोपीन एंटीऑक्सिडेंट्स रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करते. याव्यतिरिक्त संशोधकांनी सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी ऑलिव्ह ऑईलसारख्या मोनोअनसॅच्यूरेटेड फॅट्सचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. ५ ग्राम ऑलिव्ह ऑईलच्या सेवनानं कोरोनरी हार्ट डिसीज ७ टक्के, कार्डिओवॅस्कूलर डिसीज ४ टक्के आणि मृत्यूचा धोका ८ टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो.
दिवसभरातून कमीतकमी दोनवेळा भाज्यांचे सेवन केल्यानं हृदयरोगानं होणारा मृत्यूचा धोका ३४ टक्क्यांनी कमी होतो. याव्यतिरिक्त रेड, प्रोसेस्ड मीटचे कमी सेवन केल्यानं शरीराला सुरक्षित ठेवता येऊ शकतं .संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हिरव्या भाज्या न खाण्याचे साईड इफेक्टस संपूर्ण शरीरात दिसून येतात. हिरव्या भाज्यांमध्ये खूप फायबर्स आणि व्हिटामीन्स असतात जे शरीराचं कार्य सुरक्षित चालण्यासाठी आवश्यक असतात. टोमॅटोमध्ये लायकोपिनसह कार्ब्स, पोटॅशियम आणि प्रोटीन्स असतात ज्यामुळे आजार दूर राहण्यास मदत होते.
जर तुम्हाला भाज्या खायला आवडत नसतील तर तुम्ही त्यात वेगवेगळे प्रयोग करून छान पदार्थांचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यानंही शरीराला फायदे मिळतात. यामध्ये असणारे फायबर्स, मिनरल्स पचनतंत्र सुधारून रक्ताभिसरण व्यवस्थित राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.