आधी ही चिडचिड करत नव्हती, अलीकडेच अशी झाली आहे. त्याचं सध्या काय बिनसलंय माहीत नाही, एकटा एकटा असतो, गप्प गप्प राहतो, सतत अंधार करून बसतो. हिला तर रागवायला कारणच लागत नाही, राग सतत नाकाच्या शेंड्यावरच असतो... ही आणि अशी अनेक विधानं कानावर पडतात. त्यामागे पार्श्वभूमी ही केवळ परिस्थितीची वा मनस्थितीची असते असे नाही, तर शरीरातील अंतर्गत बदलसुद्धा त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, जसे की जीवनसत्त्वाची कमतरता!
शरीरासोबतच मानसिक विकासासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची असतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे, एखादी व्यक्ती नैराश्याची शिकार होऊ शकते. तिच्या स्वभावात बदल होऊ शकतो. ती तापट अथवा शीघ्रकोपी होऊ शकते. हे बदल ओळखायचे कसे आणि त्यावर उपाय कोणते याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.
निरोगी शरीरासोबतच मनही निरोगी असणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात, त्याचप्रमाणे पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. फरक पडतो. आजकाल बहुतेक लोक डिप्रेशनचे शिकार होत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डिप्रेशन येते?
व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते. शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. आनंदी संप्रेरक, डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी उपयुक्त ठरू शकते. दीर्घकाळ ही समस्या राहिली तर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, लोह आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे देखील नैराश्य येऊ शकते.
व्हिटॅमिन डी कमी असल्याची लक्षणे :
शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून गंभीर परिस्थिती टाळता येते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणाची समस्या उद्भवते. हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. जखम झाली की ती सहज बरी होत नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.
व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्याचे उपाय :
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेवर मात करण्यासाठी दररोज काही वेळ उन्हात बसा. कोवळ्या उन्हात बसल्याने, फिरल्याने शरीराला आवश्यक पोषकतत्त्व मिळतात. तनाला आणि मनाला तजेला मिळतो. नैराश्य दूर होते आणि हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात.
सकस आहार :
व्हिटॅमिन डी साठी, अंड्यातील पिवळ बलक, मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मशरूम इत्यादींचा आहारात समावेश करा. तरीदेखील दीर्घकाळ त्रास होत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.