तरूणपणात अनेकजण कामाच्या व्यापात तर कोणी धार्मिक कारणांसाठी उपवास केल्यानं तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. जास्तवेळ उपाशी राहिल्यानं भविष्यात अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. निष्काळजीपणा केल्यास डायबिटीस टाईप २, ब्लड प्रेशरचे आजार उद्भवू शकतात. वाढत्या वयात शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणंही फार महत्वाचं असतं. अन्यथा डायबिटीसचं निदान होऊन शकतं. वेळीच साखरयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवलं नाही तर इतर आजार बळावण्यची शक्यता असते.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा डायबिटीसचे निदान झाले की आजार नेहमीच तुमच्यासोबत राहतो. टाईप २ डायबिटीसची समस्या लठ्ठपणा, खराब जीवनशैली, चुकीच्या आहारामुळे उद्भवते. डायबिटीसमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टर योग्य आहार आणि व्यायामाची शिफारस करतात. या व्यतिरिक्त, औषधं आणि इन्सुलिन थेरपी सारखे उपचारसुद्धा केले जातात. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर उपाशी न राहता वेळेवर नाष्ता करायलाच हवा.
सकाळी नाश्ता करण्याची वेळ?
NDO 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार डायबिटीसच्या रुग्णांनी 8:30 च्या आधी नाष्ता करायला हवा. त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. या संशोधनात, अमेरिकेतील १० हजारांपेक्षा लोकांच्या खाण्याच्या कालावधीच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले होते. या संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांनी सकाळी 8.30 च्या आधी नाश्ता केला त्यांच्यामध्ये साखर आणि इन्सुलिन प्रतिरोधक पातळी कमी होती.
नाश्त्याला काय खायचं?
डायबिटीक रुग्ण प्रोटिन्स, फायबर्सयुक्त, मोड आलेली कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करू शकतात. रोज ठरलेल्या वेळी नाश्ता केल्यास शरीर चांगले राहते. दही, अंडी, भाज्या, फळे या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. डायबिटीस असलेल्या लोकांना जास्त तळलेल्या गोष्टी खाण्यास मनाई आहे. कारण यात चरबी आणि कॅलरीज जास्त असतात. म्हणून तळलेल्या पदार्थांपासून लांब राहणं फायद्याचं ठरतं.
व्यायाम कोणत्यावेळी करायचा?
डायबिटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारच्यावेळी व्यायाम करणं फायदेशीर ठरतं. या अभ्यासानुसार टाईप२ डायबिटीसचे रुग्ण दुपारच्यावेळी हाय इंटेसिटी वर्कआऊट करत असतील तर त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. Express.co.uk च्या रिपोर्टनुसार सकाळच्यावेळी हाय इंटेसिटी वर्कआऊट केल्यानं ग्लूकोजच्या पातळीत नकारात्मक परिणाम दिसून येतो.