गेल्या काही वर्षात तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे पडसाद जगभर उमटत आहेत. बालपणी उन्हाळी सुट्टीच्या वेळी आईस्क्रीम, कुल्फी, बर्फ़ाचे गोळे खाऊन सुसह्य वाटणारा उन्हाळा आता सहन होईनासा झाला आहे. घराघरात कुलर, एसी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हामुळे घाम येणे स्वाभाविक आहे पण इतर वेळी सुद्धा इतरांच्या तुलनेस घामाने ओथंबलेले लोक पाहिले की प्रश्न पडतो, एवढा घाम येणे नॉर्मल आहे की एखाद्या आजाराचे लक्षण? चला जाणून घेऊ.
उन्हाळ्यात प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. काही लोक असे असतात जे बाहेरील उष्णतेशी सहज जुळवून घेतात. तर काही लोकांना गार पाण्याचा हबका मारला, फॅनखाली बसलो, पाणी प्यायले तरी परिस्थिती आटोक्यात आल्यासारखी वाटते. मात्र काही जण असे असतात ज्यांच्या घामाच्या धारा थांबतच नाहीत. असे का होते, याचे कधी निरीक्षण केले आहे का?
Early Menopause: अवघ्या चाळीशीत महिलांना का येऊ लागला आहे मेनोपॉज? जाणून घ्या ५ कारणं!
थर्मोरेग्युलेशन ही मानवी शरीरातील एक प्रक्रिया आहे जी शरीराच्या आत स्थिर तापमान राखण्याचा प्रयत्न करते. जेव्हा बाह्य वातावरणाचे तापमान वाढते तेव्हा शरीराला घाम येतो. परंतु काही लोकांच्या शरीरात ही यंत्रणा योग्यरित्या काम करत नाही, ज्यामुळे त्यांना जास्त उष्णता जाणवते.
काही लोकांमध्ये चयापचय वेगाने होते, ज्यामुळे त्यांच्या शरीरात जास्त ऊर्जा निर्माण होते. त्यांनाही अधिक प्रमाणात घाम येतो.
हार्मोनल असंतुलनामुळे देखील हे होऊ शकते. विशेषतः महिलांना रजोनिवृत्ती, गर्भधारणा किंवा PCOS सारख्या परिस्थितींमुळे हार्मोनल बदलांचा अनुभव येतो, ज्यामुळे शरीराचे तापमान प्रभावित होऊ शकते. याशिवाय, थायरॉईडच्या समस्येमुळे शरीराचे तापमान वाढू शकते.
लठ्ठपणा: ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांच्यामध्ये पचनाची प्रक्रिया मंदावते. अशा लोकांना शरीर थंड करण्यात अडचण येते. त्यावेळी घामावाटे शरीर थंड होते. हे नैसर्गिकपणे घडते.
मसालेदार वा तिखट पदार्थ खाल्ल्यावरदेखील घाम फुटतो, किंवा एखादी व्यक्ती सतत ताणतणावाखाली असेल आणि कमी पाणी पित असेल तर अशा स्थितीतही शरीरात उष्णता वाढते आणि भरपूर घाम येतो.
ही सगळी लक्षणे नैसर्गिक आहेत. मात्र हृदयावर ताण येऊन एसी मध्ये बसलेले असतानाही घाम फुटत असेल, किंवा भीती वाटून हृदयाचे ठोके अनिश्चित गतीने वाढले असतील तर येणारा घाम हे हृदय विकाराशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते.
इतर वेळी येणारा घाम, काम करून, व्यायाम करून, नाचून, धावून, डोंगर चढून, पायऱ्या चढून येणारा घाम नैसर्गिक आहे, त्यात काळजीचे कारण नाही. जरी इतरांच्या तुलनेत तुम्हाला जास्त घाम येत असला तरी ती तुमची उष्ण प्रकृती असल्याचे लक्षण आहे, शरीर नैसर्गिक रित्या थंड ठेवण्यासाठी घाम ही त्यावर केलेली तजवीज आहे!