थोडंसं जास्त काम झालं किंवा अंगमेहतन थोडी जास्त झाली तर लगेचच हाडं ठणकत असल्याचा अनुभव अनेकजणं हल्ली वयाच्या पंचविशीतच घेत आहेत. खूप वेळ बसून उठलं की अनेकांचे गुडघे (knee pain) कुरकरू लागले आहेत. अगदी तिशीत असणाऱ्या अनेक जणींना कंबर आखडून गेल्याचा अनुभव तर नेहमीच येतो... मग घरातल्या मोठ्या स्त्रियांकडे म्हणजे आई- आजी यांच्याकडे पाहून वाटतं की बापरे... आताच माझ हे हाल तर यांच्या वयाचं झाल्यावर काय होणार.... म्हणूनच मैत्रिणींनो आतापासूनच तब्येतीला जपा आणि हाडांचं दुखणं (how to keep bones strong) कमी वयातच मागे लागून घ्यायचं नसेल तर या काही चुका टाळा...
१. व्हिटॅमिन डी
आजकाल घरातून गाडीत आणि गाडीतून ऑफिसमध्ये असं अनेकांचं रुटीन झालं आहे. सकाळी- सकाळी ऑफिसला निघून गेल्यानंतर थेट सुर्य मावळल्यानंतरच आपण परततो. त्यामुळे उन्हाचा आणि आपला असा थेट संबंध येतच नाही.. हाडांसाठी सुर्यप्रकाशासारखं दुसरं उत्तम टॉनिक नाही. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्याचा प्रयत्न करा. हाडांना मजबूती देणारं व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सुर्यप्रकाशात वावरणं गरजेचं आहे.
२. मीठाचं अतिसेवन नको
तरुण वयातच हाडांचं दुखणं सुरू झालं असेल तर, कमी मीठ खाण्याची सवय लवकरच स्वत:ला लावून घ्या. कोणत्याही पदार्थावर वरतून मीठ घेणे टाळा. मीठ जर जास्त खाल्लं तर बोन डेंसिटी कमी होण्यास सुरुवात होते. मीठामधलं सोडियम हाडांतील कॅल्शियम कमी करतं. त्यामुळे आहारातील मीठाचा वापर सांभाळून करा.
३. शरीराची मुव्हमेंट ठेवा
खूप वेळ एका जागी बसून काम करत असताना साहजिकच शरीराची हालचाल कमी होते. पण हीच सवय हाडांना आळसवून टाकते. त्यामुळे दररोज शरीराची ठराविक हालचाल झालीच पाहिजे. काही लोक खूप आळशी असतात. त्यामुळेही त्यांची शारिरीक हालचाल कमी होते आणि मग हाडांचं दुखणं कमी वयातच मागे लागतं.
४. आहाराकडे लक्ष द्या
अनेकदा जेवायचं म्हणून नाही, तर पोट भरायचं म्हणून पोटात काहीतरी ढकललं जातं आणि वेळ मारून नेली जाते. पंचविशी- तिशीतल्या तरूणाईत तर ही सवय मोठ्या प्रमाणावर आहे. हिरव्या पालेभाज्या, दूध किंवा कॅल्शियम असणारे इतर पदार्थ शरीराला न मिळाल्यानेही हाडांचं दुखणं मागे लागतं. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट सुरू करा.