हिंग हा भारतीय पदार्थांमधील एक महत्त्वाचा मसाल्याचा घटक. पदार्थाला चव येण्यासाठी वापरला जाणारा हिंग आपण दररोज वापरत असतो. कोणत्याही पदार्थाला चव आणि स्वाद येण्यासाठी आपण हिंगाचा आवर्जून उपयोग करतो. आपल्या घरात तयार होणाऱ्या बगहुतांश पदार्थांची फोडणी ही हिंगाशिवाय पूर्ण होत नाही. हिंगामध्ये पांढरे, पिवळे, लाल हिंग, खडे हिंग असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. हिंग गुणकारी असल्याने अनेक आयुर्वेदीक औषधांमध्येही त्याचा वापर केला जातो. त्यामुळे हिंगाची किंमत जास्त असते. हिंग औषधी असते, आरोग्य़ासाठी त्याचे बरेच फायदे असतात हे आपल्याला माहित असते पण हिंगाच्या वापराने नेमके कोणते फायदे होतात हे फारच कमी जणांना माहित असेल. हिंगाचा आपण चिमूटभर इतकाच वापर करत असलो तरी आरोग्यासाठी असणारे त्याचे भन्नाट फायदे आपल्याला माहित असायला हवेत. पाहूया आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे हिंगाचे आहारातील महत्त्व सांगताना काय म्हणतात...
१. पचनासाठी फायदेशीर
अनेकदा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पचनाशी निगडीत समस्या असतात. अशावेळी आयुर्वेदात हिंगाचे चाटण देण्यास सांगितले जाते. हिंग हा स्वयंपाकात स्वादासाठी वापरला जाणारा घटक असला तरी पचनाशी निगडीत समस्यांसाठी हिंग अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे हिंगाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
२. गॅसेसवर उपयुक्त
अनेकांना आहाराच्या चुकीच्या सवयी, वात प्रकृती, जेवणाच्या चुकीच्या वेळा किंवा व्यायामाचा अभाव यांमुळे गॅसेस किंवा पोटदुखीच्या तक्रारी उद्भवतात. वात विकार हाही त्रासदायक ठरु शकतो. अशावेळी हिंगाचे सेवन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. यासाठी ताकामध्ये हिंग घालून पिण्याची पद्धत आहे. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
३. श्वसनाशी संबंधित तक्रारी
हिंगामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने दमा ,ब्राँकायटीस यांसारख्या श्वसनाशी निगडित तक्रारींवर हिंग अतिशय उपयुक्त ठरतो. हिंगाची पेस्ट छातीवर लावल्यास कफ कमी होण्यास मदत होते. हिंग, आलं आणि मध यांची गोळी पूर्वी कफ झाल्यावर आवर्जून दिली जायची. त्यामुळे श्वसनाशी निगडित तक्रारींवर हिंग गुणकारी आहे.
४. मासिक पाळीतील समस्या
मासिक पाळीत स्त्रियांना होणारी पोटदुखी, मळमळ यांसारख्या त्रासावर हिंग अतिशय फायदेशीर असते. महिलांच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढण्यासाठी हिंग फायदेशीर ठरते. त्यामुळे पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होते. अति रक्तस्त्राव, अनियमित पाळी अशा समस्या असतील तर अशा महिलांनी आहारात आवर्जून हिंगाचा उपयोग करायला हवा.
५. साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल
हल्ली कमी वयातच अनेकांना शुगर आणि कोलेस्टेरॉलची समस्या असल्याचे जाणवते. शरीरातील या घटकांची पातळी वाढली की आरोग्याची गुंतागुंत निर्माण होते. पण रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हिंग खाणे अतिशय फायदेशीर ठरते.