उन्हाचा कडाका कमी होऊन जोरदार पावसाला सुरूवात झाली, की ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचू लागतात. या पाण्यात मग डासांची पैदास सुरू होते आणि हे डास अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देतात. त्यामुळेच पावसाळा सुरू होताच चिकनगुनिया, डेंग्यू अशा आजारांचे प्रमाण वाढू लागते. सध्या तर या आजारांमध्ये कोरोनाचीही भीती आहेच. कोरोना होऊ नये, म्हणून आपण सगळे तर काळजी घेतच आहोत. आता डेंग्यू आणि चिकनगुनियापासून कुटूंबाचे संरक्षण करण्याची आणखी एक जबाबदारी आई, पत्नी, सून, मुलगी म्हणून प्रत्येक स्त्रीवर येणार आहे. म्हणूनच डेंग्यू आपल्या घरात येऊ नये, म्हणून काही उपाय अवश्य करा.
कसा होतो डेंग्यू ?
एडीस इजिप्ती या जातीचा डास चावला तर डेंग्यू होतो. या डासाची वाढ पाण्यात होते. डेंग्यूवर वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. म्हणून हा आजार पसरू न देण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे असते.
डेंग्यू होऊ नये म्हणून असे उपाय करा...
१. उन्हाळ्याचा उकाडा कमी करण्यासाठी घराघरात डेझर्ट कुलर लावले जाते. आता उन्हाळा संपून दोन महिने होत आले आहेत, तरीही अनेक घरांमध्ये कुलर तसेच दिसते आहे. या कुलरमध्ये जर पाणी साचलेले असेल, तर ते लगेचच काढून टाका. कारण या पाण्यात डासांची वाढ होण्याची शक्यता खूपच जास्त आहे.
२. घराच्या परिसरात, अंगणात, गच्चीवर अनेकदा पाण्याचे डबके साचते. रिकाम्या कुंड्या आणि भांड्यांमध्ये पाणी जमा होते. अशी जागा त्वरीत साफ करा आणि पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या.
३. हौदात किंवा पाण्याच्या टाकीत गप्पी मासे सोडा.
४. गच्चीवरील किंवा अंगणात, अडगळीत ठेवलेले रिकामे टायर्स, शहाळे यांच्यात पाणी साचते, हे पाणी त्वरीत काढून टाका आणि पाणी साचेल, अशा सगळ्या वस्तू उपड्या ठेवा. जेणेकरून पाणी साचणार नाही.
५. आठवड्यातून एकदा पाणी साठवायची सगळी भांडी रिकामी करा, स्वच्छ घासून घ्या आणि त्यानंतर एखादा दिवस ती कोरडीच राहू द्या.
६. घरात डेकोरेशन म्हणून अनेकजणी पाण्याने भरलेले गंगाळ ठेवतात. अशी सजावट करणे पावसाळ्यात टाळावे. कारण या पाण्यातही डास होण्याचा धोका असतो.
७. फ्लॉवरपॉटमध्ये पाणी भरून त्यात वेगवेगळे फ्लॉवर डेकोरेशन करण्याची अनेकींना आवड असते. पण पावसाळ्याच्या दिवसात ही आवडही अंगाशी येऊ शकते. घरामध्ये पाणी भरून ठेवण्याशी संबंधित कोणतीही कलाकुसर करणे पावसाळ्यात टाळावे.