कोणताही आजार झटपट बरा व्हावा म्हणून आपण ऍलोपॅथीच्या गोळ्या घेतो. कारण आयुर्वेदाने लाभ मिळायला बराच वेळ लागतो हे आपण जाणतो. मात्र लक्षात घ्या, आयुर्वेदाला ४००० वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे हे शास्त्र दुय्यम न मानता दैनंदिन जीवनशैलीत त्याचा समावेश केला तर आजार होणारच नाहीत किंवा झालेल्या आजारातून कायमस्वरूपी सुटका होईल. यासाठी आयुर्वेदात सांगितलेले नियम पाळा आणि निरोगी राहा.
>> कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
>> आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.
>> रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी किंवा जिरे, ओवा घालून उकळवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रिया वाढते. ज्यामुळे वजन कमी होण्यास वा नियंत्रित राहण्यास मदत होते.
>> आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गूळ अथवा मधाचा वापर करू शकता.
>> आहारात नियमितपणे दही असेल तर शरीर निरोगी राहील.
>> पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल.
>> अपुऱ्या झोपेमुळेही वजन वाढते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही.
>> योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. शरीर लवचिक होते.
>> रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घेतल्यास आरोग्य उत्तम राहते.
>> रोज ४५ मिनिटं घाम काढत चालल्याने शरीराची यंत्रणा सुरळीत राहते.
>> दिवसभरात दोन ते तीन वेळा आहार घ्यावा, त्यात कच्च्या भाज्या, फळं यांचा जास्त समावेश असावा. पोटभर न जेवता भुकेचा पाव भाग शिल्लक राहील एवढाच आहार घ्यावा.
>> तेलकट, मसालेदार अन्नसेवन न करता सात्विक आहार घ्या, ताजे ताक प्या आणि प्रत्येक वेळी जेवणानंतर शतपावली करा.