अंगदुखी, थकवा येणे यांसारख्या तक्रारी महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. घरातली कामं, ऑफीस, मुलांची जबाबदारी, शरीरात होणारे हार्मोन्सचे बदल अशी काही प्रमुख कारणे यामागे असतात. महिलांची शरीरयष्टी, पुरुषांच्या तुलनेत वेगळी शरीररचना, कामाची जबाबदारी, पुरुषप्रधान संस्कृती यामुळे वातरोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. खासकरून स्त्रियांचे गर्भाशय व स्तन या अवयवांमुळे त्यांच्यात हार्मोन्सचे प्रमाणही जास्त असल्याने त्यांना वातरोग होण्याची शक्यता जास्त असते. असे झाले की अंग ठणकणे, सतत थकवा वाटणे या तक्रारी उद्भवू शकतात. मात्र बहुतांश स्त्रिया या तक्रारींवर उपाय न करता हे दुखणे अंगावर काढत राहतात (Health Tips Vat Problem in Women's).
साधारणत: चाळिशीनंतर महिलांमध्ये संधिवात, आमवात, वातरक्त होण्याची शक्यता वाढते. कारण या काळात पाळी जाते. त्यामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते. पाळी जाण्याच्या काळात महिलांमध्ये कॅल्शिअम, हिमोग्लोबिन कमी होणे व त्यामुळे शरीरातील ताकद कमी होणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात. तरुण असताना शरीर सर्वकाही सहन करू शकते. पण जसे वय वाढत जाते तसे हे त्रास वाढतात. प्रसूतीनंतर महिलांचे शरीर कमकुवत होते. त्यातही वेळेत न खाणे, पोषणयुक्त आहार न घेणे, पुरेशी झोप न घेणे यामुळे वाताच्या तक्रारी वाढतात. काही वेळा वातामुळे मणक्याच्या तक्रारीही उद्भवतात.
वात म्हणजे नेमके काय होते?
संधिवात :
संधिवात म्हणजेच अर्थायटिस. यामध्ये दोन प्रकार आहेत. एकामध्ये शरीरातील सगळे सांधे दुखतात, तर दुसऱ्या प्रकारात मोठे सांधे जसे गुडघे, खांदे दुखतात. तसेच गाउट किंवा वातरक्त आजारही संधिवातातच मोडतो. पित्त वाढल्यामुळे हा होतो. यामध्ये सांध्याच्या ठिकाणी दाह होतो आणि त्याची सुरुवात पायाच्या अंगठ्यापासून होते.
आमवात :
आमवात म्हणजेच हेर्मेटॉइड अर्थायटिस. यामध्ये वेदना फिरती असते. आता गुडघ्यात दुखत असेल तर काही वेळाने घोट्यात किंवा इतर ठिकाणी दुखते. याचे कारण म्हणजे दुपारी झोपणे होय. बहुधा बायका सकाळी लवकर उठून काम करतात व दुपारी जेवल्यानंतर झोपतात. यामुळे हा वात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.
काय काळजी घ्यायला हवी?
वातरोगतज्ज्ञ डॉ. संगीता वाघमोडे याविषयी महिलांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी याविषयी सांगतात. स्त्रियांनी शिळे खाणे बंद करायला हवे. वेळेत जेवणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहाराच्या बाबतीत अवश्य पाळायला हवी. वातूळ पदार्थ न खाणे, तसेच अतितिखट, लोणचे, दही यांसारखे आंबट पदार्थ योग्य प्रमाणात खायला हवेत. रात्री उशिरा झोपू नये. खाण्यात साजूक तुपाचा वापर करायला हवा. सोबत जवस, काळे तीळ रोज खायला हवेत. कॅल्शिअम असलेले दूध, नाचणी हे पदार्थ आहारात जास्त प्रमाणात घ्यायला हवेत. एकंदरीत स्वत:कडे लक्ष न दिल्याने वाताच्या समस्या वाढतात. खासकरून चाळिशीनंतर शरीराची झीज जास्त होत असल्याने पोषणमूल्ययुक्त जेवण, पुरेसा आराम, झोप गरजेची असते.