Join us   

Health Tips : डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 11:18 AM

Health Tips : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया...

ठळक मुद्दे कारले, मेथी यांसारख्या कडू चवीच्या भाज्या खाणे डायबिटीससाठी फायदेशीर ठरते. पांढरा तांदूळ वापरण्याऐवजी लाल किंवा हातसडीचा तांदूळ वापरल्यास त्याचा डायबिटीसच्या लोकांना अपाय होत नाही. 

डायबिटीस (Diabetes)हा आजार नसून ही जीवनशैलीविषयक समस्या आहे हे आता जवळपास सगळ्यांनाच माहित आहे. मात्र अगदी कमी वयात उद्भवणारी ही समस्या वेळीच आटोक्यात ठेवली नाही तर आरोग्याची गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी निदान, आहाराचे नियम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार हाच यावर उपाय आहे(Health Tips)  . वाढलेली शुगर नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात आहे. ते आपण योग्य पद्धतीने साध्य करु शकलो तर आपले आयुष्य नक्कीच सुकर होईल. डायबिटीसमध्ये औषधोपचाराच्या बरोबरीने आहार हा अतिशय महत्त्वाचा असतो. डायबिटीस असणाऱ्या लोकांनी हे खाऊ नये, ते खाऊ नये असे आपण अनेकदा ऐकतो (Diet for Diabetes).  पण आयुर्वेद (Ayurved) त्याबद्दल काय सांगते हे समजून घेणे गरजेचे आहे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली (Dr. Nitika Kohli) याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया...

(Image : Google)

१. धान्ये आणि डाळी 

आपण साधारणपणे पोळीसाठी गहू, भातासाठी तांदूळ आणि वरण किंवा आमटीसाठी तुरीची डाळ वापरतो. पण सतत हेच वापरत राहिल्यास आपल्या शरीराला आवश्यक असणारे इतर घटक मिळत नाहीत. त्यामुळे आपल्य़ा आहारात विविध प्रकारची धान्ये, मूग, मसूर, उडीद, हरभरा यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये यांचा वापर करायला हवा. 

२. बार्ली आणि आवळा 

बार्ली हे एकप्रकारचे धान्य आहे. ते डायबिटीससाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे बार्लीचे सत्व, बार्लीचे पाणी यांसारख्या गोष्टी आहारात असायला हव्यात. इतकेच नाही तर बाजारात सहज उपलब्ध होणारा आवळा हा डायबिटीससाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. त्यामुळे आवळ्याचे सरबत, आवळा कँडी, मोरावळा, आवळ्याचे लोणचे असे आवळ्याचे पदार्थ डायबिटीस असणाऱ्यांच्या आहारात आवर्जून असायला हवेत.

३. मूग डाळ सूप आणि कडू भाज्या

मूग डाळ ही पचायला हलकी आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त डाळ आहे. मूगाच्या डाळीतून आपल्याला चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे मूगाच्या डाळीचे सूप आवर्जून प्यायला हवे. याबरोबरच कारले, मेथी यांसारख्या कडू चवीच्या भाज्या खाणे डायबिटीससाठी फायदेशीर ठरते. 

४. हातसडीचा तांदूळ आणि राळं प्रकारातील धान्य

आपण साधारणपणे गहू, ज्वारी किंवा तांदूळ खातो. पण त्याचबरोबर आहारात बाजरी, नाचणी, राजगिरा यांसारखे राळं प्रकारातील धान्यही आवर्जून खायला हवे. याबरोबरच पांढरा तांदूळ वापरण्याऐवजी लाल किंवा हातसडीचा तांदूळ वापरल्यास त्याचा डायबिटीसच्या लोकांना अपाय होत नाही.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनामधुमेह