आनंदाच्या भरात डोळ्यात पाणी येते त्याला आपण आनंदाश्रू म्हणतो, मात्र दुःखात, रागात, अपयशी झाल्यावर जे रडू कोसळते ते सहसा पटकन थांबत नाही. एवढे की रडून रडून डोकं जड होते तेव्हा कुठे रडू आवरावे लागते. मात्र रडल्यामुळे डोळे सुजणे समजू शकतो पण डोकेदुखी होण्याचे काय कारण? चला जाणून घेऊ.
असे म्हटले जाते की रडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्याला भावनिक ताण, आनंद, दुःख किंवा वेदना व्यक्त करण्यास मदत करते. मात्र, रडल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. हा एक सामान्य अनुभव आहे परंतु बऱ्याच लोकांना हे माहीत नाही. काही जण रडू आवरण्याचा प्रयत्न करतात. मनातल्या मनात कुढतात आणि एकांताच्या क्षणी रडून मोकळे होतात. म्हणजेच काय तर रडल्यामुळे मन मोकळे होते. त्याबरोबरच जास्त ताण आला तर डोकेदुखीही होते. त्याचा परस्परसंबंध जाणून घेऊ.
तणाव आणि भावनिक ताण
रडणे अनेकदा माणसाला तेव्हाच येते जेव्हा त्याला ताण येतो. याचा अर्थ असा की रडणे बहुतेकदा भावनिक तणावाशी संबंधित असते. जेव्हा आपण खूप भावनिक असतो, तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन सोडते. या हार्मोनचा रिलीझमुळे स्नायू तणावग्रस्त होतात आणि डोकेदुखी होऊ शकते.
डीहायड्रेशन
हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. रडताना डोळ्यातून पाणी येते! जर शरीरात पाण्याची कमतरता असेल आणि अशा स्थितीत तुम्ही जास्त तणावामुळे रडत असाल तर उरलेले पाणीही कमी होते. त्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते.
सायनस
काही लोकांना सायनसचा त्रास असतो. ऍलर्जी किंवा ब्लॉकेजची समस्या असते. रडल्यावर नाक वाहते. जास्त रडण्यामुळे नाक बंद होऊ शकते आणि सायनसवर दबाव वाढू शकतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. रडताना नाक आणि डोळ्याभोवती रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे डोळ्याला सूज आणि डोकेदुखी होऊ शकते. मायग्रेन अर्थात अर्धशिशी असणाऱ्यांनाही याचा त्रास होतो.
केमिकल चेंज
रडण्यामुळे शरीरात सेरोटोनिन आणि एड्रेनालाईन सारखे न्यूरोट्रांसमीटर बाहेर पडतात, ज्यामुळे मूड खराब होतो आणि या संप्रेरकांच्या चढउतारांमुळे डोकेदुखी होऊ शकते.
रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात
रडताना, आपल्या रक्तवाहिन्या प्रथम विस्तारतात आणि नंतर संकुचित होतात. या प्रक्रियेमुळे डोकेदुखी होऊ शकते, विशेषत: जे अतिसंवेदनशील आहेत त्यांना हा त्रास होऊ शकतो.
ऑक्सिजनची कमतरता
जास्त रडत असताना, आपल्या श्वासोच्छवासाचा वेग वाढू शकतो किंवा आपल्याला उचकी लागू शकते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता असू शकते आणि डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.
अशा डोकेदुखीवर उपाय काय? तर...
पुरेसे पाणी प्या
जसे आम्ही तुम्हाला सांगितले की डिहायड्रेशन हे डोकेदुखीचे प्रमुख कारण असू शकते. रडल्यानंतर एक ग्लास पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट प्यायल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.
दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा
ऑक्सिजनची कमतरता हे देखील डोकेदुखीचे एक कारण आहे. अशा स्थितीत खोल श्वास घेतल्याने शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि तणाव कमी होतो. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
थंड पाण्याच्या पट्ट्या
पाणी प्यायल्यानंतरही काही फरक दिसत नसेल आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर थंड पाण्यात कापड भिजवून कपाळावर लावल्याने आराम मिळतो.
हलका मसाज करा
डोके आणि मानेला हलका मसाज केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.
शांत वातावरणात विश्रांती घ्या
शक्य असल्यास काही वेळ डोळे मिटून झोपा आणि आराम करा. अंधाऱ्या आणि शांत वातावरणात विश्रांती घेतल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते. तुम्ही दुधात भिजवलेला कापसाचा बोळा किंवा थंड काकडीचा तुकडा डोळ्यांवर ठेवू शकता.
आल्याचा चहा
आल्याचा चहा डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे स्नायूंचा ताण कमी करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. हे विशेषतः मायग्रेन आणि तणाव-प्रकारच्या डोकेदुखीमध्ये फायदेशीर ठरू शकते.
डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे का?
रडल्यानंतर डोकेदुखी खूप सामान्य आहे, परंतु जर ते वारंवार होत असेल किंवा वेदना असह्य होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर डोकेदुखी खूप दिवस राहिली. डोकेदुखी सोबत उलट्या, चक्कर येणे किंवा अंधुक दिसणे यांसारख्या समस्या असतील तर सल्ला घेणे आवश्यक आहे.