Join us   

सणवारात खा खा खाल्लं, अपचन-पोट फुगण्याचा त्रास होतो? करा ४ सोपे उपाय, पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 4:05 PM

Healthy Diet tips for good Digestion Morning routine : पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर ४ गोष्टींचे अवश्य सेवन करायला हवे.

सणवार म्हटलं की आपसूकच आपल्याकडून नेहमीपेक्षा थोडं जास्तच खाल्लं जातं. त्यातही गणेशोत्सव म्हटल्यावर आरती, प्रसाद, गौरीजेवण आणि कोणाकडे दर्शनाला गेल्य़ावर त्यांना आग्रहाने दिलेले गोडाधोडाचे पदार्थ. वर्षातून एकदाच येणारा सण असल्याने मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो. पण त्यामुळे काही वेळा पोटावर अत्याचार होतात हेही तितकेच खरे. सणावारांच्या निमित्ताने आणि पाहुणे एकत्रा आल्याने जास्तीचे खाल्ले गेल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच पचनक्रियेवरही याचा ताण येऊ शकतो. त्यामुळे कितीही आग्रह झाला किंवा आवडीचे पदार्थ असतील तरी योग्य प्रमाणातच खायला हवेत. तसेच खाल्ल्यानंतर थोडे चालणे, पचनक्रिया सुरळीत होईल यासाठी किमान हालचाल करणे. त्यापुढचे खाणे हलके आणि कमी प्रमाणात घेणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. तसेच पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर ४ गोष्टींचे अवश्य सेवन करायला हवे. या ४ गोष्टी कोणत्या आणि त्या कशा खायच्या पाहूया (Healthy Diet tips for good Digestion Morning routine)...

१. काळ्या मनुकांचे पाणी 

मनुकांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने अशक्तपणा दूर होण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. या पाण्यात फायबर आणि पेनिफेनॉल असल्याने शरीरातून खराब फॅटस आणि जास्तीचे कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी या पाण्याचा चांगला उपयोग होतो, त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होते. गर्भधारणा होण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी हे पाणी अतिशय चांगले असते. 

२. केशर पाणी

केशर पाणी म्हणजे 8-10 तास केशराच्या काड्या मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. चमकदार, मुरुममुक्त त्वचेसाठीही हे पाणी उत्कृष्ट आहे. शरीरातील चरबी कमी होण्यास तसेच दाहक विरोधी, मूड  सुधारण्यास उपयुक्त गुणधर्म यामध्ये असतात. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळी नियंत्रित करण्यास या केशर पाणी पिण्याचा चांगला उपयोग होतो. 

३. मेथ्यांचे पाणी

 मेथीचे पाणी अपचन, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पाचन समस्या दूर करण्यास मदत करते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. इन्सुलिन प्रतिरोधक आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे पाणी उपयुक्त असते कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. 

४. पाण्यात भिजवलेले अंजीर

रात्रभर पाण्यात भिजवलेले अंजीर सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. कारण अंजीरमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. ज्यामुळे आतड्याची हालचाल सुधारण्यास मदत होते. हे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते, रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना