Join us   

Healthy Lifestyle : 5 गोष्टी देतात गंभीर आजारांना आमंत्रण, जीवाला धोका! तुम्ही दुर्लक्ष करत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 12:07 PM

Healthy Lifestyle : वयाच्या एका टप्प्यावर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात आणि मग मात्र आपण फारसे काही करु शकत नाही. त्यापेक्षा आधीपासूनच काळजी घेतलेली चांगली नाही का?

ठळक मुद्दे ठराविक वयानंतर नियमितपणे आरोग्यतपासणी करायला हवी. त्यामुळे आपण गंभीर आजारांपासून स्वत:चा बचाव करु शकतो. विविध कारणांनी आलेल्या नैराश्यासारख्या मानसिक समस्यांमुळे जगात दररोज शेकडो लोक आत्महत्या करतात.

आपली जीवनशैली हीच आपल्य़ा आरोग्याच्या अनेक तक्रारींचे महत्त्वाचे कारण असते. आपल्याला असलेल्या आहार-विहाराच्या सवयी आपले आरोग्य चांगले ठेवायचे की बिघडवायचे यासाठी कारणीभूत असतात. महिलांच्या बाबतीत तर अनेकदा कुटुंबातील व्य़क्तींची काळजी घेता घेता स्वत:ची काळजी घेणे राहून जाते. घरातली कामे, स्वयंपाक, ऑफीस, सगळ्यांच्या वेळा आणि सगळे करता करता महिलांचे स्वत:कडे खूप दुर्लक्ष होते. खाण्यापिण्याच्या सवय़ी, व्यायामाला न मिळणारा वेळ आणि इतर अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतो. पण वयाच्या एका टप्प्यावर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात आणि मग मात्र आपण फारसे काही करु शकत नाही. त्यापेक्षा आधीपासूनच काळजी घेतलेली चांगली नाही का? पाहूयात कोणत्या (Healthy Lifestyle) बाबतीत लक्ष दिले नाही तर जीवावर बेतू शकते....

(Image : Google)

 १. अकाली वृद्धत्व

जे लोक सतत एकाच जागी बसून राहतात आणि शरीराची हालचाल करत नाहीत त्यांना अकाली वृद्धत्व येतं आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर हालचाल न केल्याने अन्नाचे पोषण होत नाही आणि पचनाशी निगडीत किंवा इतरही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच पुरेशी हालचाल केलेली केव्हाही चांगली. 

२. लठ्ठपणा 

लठ्ठपणा ही सध्या जगभरातील एक मोठी समस्या झाली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, ताणतणाव यांमुळे उद्भवणारा लठ्ठपणा आरोग्यासाठी घातक असतो. लठ्ठपणामुळे बीपी, डायबिटीस, हृदयरोग यांसारख्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. 

३. प्रतिकारशक्ती 

हवामानातील बदलाशी किंवा इतर कोणत्याही साथीच्या रोगांशी लढायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. त्यासाठी व्यायाम, आहार आणि एकूण आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे असते. पण आपण नियमितपणे आरोग्याकडे दुर्लक्ष करत असू आणि पुरेशी काळजी घेत नसू तर मात्र आपल्या आरोग्याच्या सतत कुरबुरी सुरू राहतात आणि त्यामुळे आपल्याला गंभीर आजारांचाही सामना करावा लागतो. 

(Image : Google)

४. मानसिक आजार 

जगभरातील लोकांना स्मृतीभ्रंशापासून ते झोपेच्या विकारापर्यंत अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजारांनी ग्रासले आहे. मात्र या सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे नैराश्य, पण हा आजार आहे आणि त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे याबाबतही आपल्याकड़े बरीच अनास्था दिसते. विविध कारणांनी आलेल्या नैराश्यासारख्या मानसिक समस्यांमुळे जगात दररोज शेकडो लोक आत्महत्या करतात. असे असूनही कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना आपल्यासोबतची व्यक्ती नैराश्यात आहे याची कल्पनाही नसते. 

५. नियमित आरोग्य तपासणी   

ठराविक वयानंतर नियमितपणे आरोग्यतपासणी करणे आवश्यक असते. याचे कारण म्हणजे मधुमेह, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, बीपी, कर्करोग हे आजार आपल्या नकळत शरीरात शिरकाव करत असल्याने आरोग्याच्यादृष्टीने ते घातक असते. त्यामुळे ठराविक वयानंतर नियमितपणे आरोग्यतपासणी करायला हवी. त्यामुळे आपण गंभीर आजारांपासून स्वत:चा बचाव करु शकतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल