Join us   

उन्हाचा त्रास, जीव पाणी पाणी होतो? उन्हाळी लागते? आहार बदला, बघा नक्की काय खाणं फायद्याचं..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 9:30 AM

Healthy Summer Diet Plan : उन्हाळ्यामध्ये दिवसाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी उठल्या-उठल्या एक ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने शरीर तर हायड्रेटेड राहतेच, शिवाय चयापचय क्रियेला प्रोत्साहन मिळते

उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप वाढते, शरीरावर याचे अनेक विपरीत परिणाम होतात. संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे, महिलांनी संतुलित व आरोग्याला अनुकूल आहार नेहमी घेतला पाहिजे पण उन्हाळ्यामध्ये आहारात काही विशेष बदल करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून शरीर दिवसभर हायड्रेटेड व उर्जावान राहील. महिलांनी उन्हाळ्यामध्ये आहाराच्या बाबतीत या टिप्सचे पालन अवश्य करावे. (Which diet is best for summer)

उन्हाळ्यामध्ये दिवसाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी उठल्या-उठल्या एक ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने शरीर तर हायड्रेटेड राहतेच, शिवाय चयापचय क्रियेला प्रोत्साहन मिळते. त्यामध्ये एक लिंबाची फोड पिळल्यास किंवा पुदिन्याची काही पाने टाकल्यास तुम्ही अजून जास्त ताजेतवाने होऊ शकता.  डॉक्टर प्रतिक्षा कदम यांनी 'लोकमत सखी'ला याबाबत अधिक माहिती दिली आहे.

पोषक ब्रेकफास्ट घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचा ऊर्जा स्तर दिवसभर उच्च राहू शकतो. एक वाटी दह्यामध्ये आंबा किंवा केळे यासारखी ताजी फळे मिसळून घेऊ शकता. मिश्र भाज्यांचा स्टफ्ड पराठा किंवा एक छोटी प्लेट पोहे, उपमा हे देखील खूप चांगले पर्याय आहेत. ब्रेकफास्टसोबत कॉफी, चहा घेणे टाळावे कारण त्यामुळे शरीर डीहायड्रेट होते.  त्याऐवजी हर्बल टी किंवा नारळपाणी प्या.

अचानक येणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका; रोज फक्त 'इतका' वेळ चाला, रिसर्चचा दावा

दुपारच्या जेवणामध्ये संतुलित आहार घ्यावा.  ताज्या भाज्या, प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स यांचा दुपारच्या जेवणात समावेश असला पाहिजे. मिश्र भाज्यांची उसळ, थोडा भात आणि कोशिंबीर घेऊ शकता. शरीर थंड व हायड्रेटेड राखण्यासाठी काकडीची कोशिंबीर अवश्य घ्यावी.

दुपारी उशिरा भूक लागू शकते आणि काहीतरी स्नॅक्स खावेसे वाटू शकतात. अशावेळी एक प्लेट मोड आलेल्या कडधान्यांची टोमॅटो आणि कांदे घातलेली कोशिंबीर, ताजी फळे व लो-फॅट दूध यापासून बनवलेले फ्रुट कस्टर्ड एक वाटी, एक वाटी रोस्टेड मखाणे हे चांगले पर्याय आहेत.

रात्रीचे जेवण हलके व पचायला सोपे असावे. ताज्या भाज्या, जिरे व कोथिंबीर घालून बनवलेले एक वाटी भाज्यांचे सूप हा उन्हाळ्यातील रात्रीच्या जेवणाचा उत्तम पर्याय आहे. ग्रिल्ड फिश, चिकन टिक्का, रोस्टेड भाज्या हे देखील काही चांगले पर्याय आहेत. थोडा ब्राऊन राईस किंवा किनोआ असल्यास संपूर्ण जेवण होऊ शकते. झोपायला जाण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध अवश्य घ्यावे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात ट्रिप्टोफॅन असते, हे असे अमिनो ऍसिड आहे, ज्यामुळे चांगली झोप लागते.

उन्हाळ्यामध्ये निरोगी आहाराची गुरुकिल्ली आहे हायड्रेटेड राहणे. संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी पीत राहा, सोडा, रस यासारखी साखरमिश्रित पेये टाळा. कैरी आणि मसाले घालून बनवलेले आंब्याचे पन्हे, पुदिना व कोथिंबीर घातलेले ताक, कोकम सरबत ही उन्हाळ्यातील खास पेये आहेत ज्यामुळे शरीर थंड व हायड्रेटेड राहते.

आरोग्याला पोषक आहार जरी घेत असाल तरी कोणता पदार्थ किती प्रमाणात खायचा याचा नीट विचार करा. आरोग्यदायी पदार्थ जरी असले तरी ते अति प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते. माफक प्रमाणात, हळूहळू खा आणि जे खात आहात त्याचा आनंद घ्या. असे केल्याने तुम्हाला जेवणाचे अजून जास्त समाधान लाभेल, अति खाणे टाळले जाईल. रात्री उशिरा स्नॅक्स अजिबात खाऊ नका, कारण त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो व अपचन होऊ शकते. झोपायला जाण्यापूर्वी स्नॅक्स खाणे टाळा.

उन्हाळ्यातील आहार गुंतागुंतीचा किंवा अनेक नियम असलेला असता कामा नये. वेगवेगळी ताजी फळे आणि भाज्या, चरबी नसलेले मांस, आरोग्याला पोषक फॅट्स यांचा दिवसभरातील आहारात समावेश करा. यामुळे तुम्हाला उत्तम पोषण मिळेल व तुम्ही उन्हाळ्यात देखील सदैव उर्जावान व तजेलदार राहू शकाल. दिवसभर भरपूर पाणी पीत राहणे आवश्यक आहे.  शरीराचा ऊर्जा स्तर उच्च राखला जावा यासाठी हेल्दी स्नॅक्स खा. या सहजसोप्या टिप्सचे पालन करून तुम्ही निरोगी राहाल, इतकेच नव्हे तर, उन्हाळ्याचा देखील आनंद घेऊ शकाल

(कन्सल्टन्ट, डाएटिशियन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई)

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यसमर स्पेशल