आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याकडे योग्य तसं लक्ष देऊ शकत नाहीत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या वाढतात. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. आयुर्वेदानुसार, शरीर निरोगी ठेवण्यासाठी शुद्ध आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. तसेच आयुर्वेदात जेवण करण्यासंबंधी काही नियमही सांगितले आहेत. ज्यांचं पालन केल्यास अनेक आाजारांपासून बचाव होतो. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम.
वातावरणानुसार करा जेवण
आयुर्वेदानुसार, नेहमी वातावरण लक्षात घेऊन आहार घेतला पाहिजे. वातावरणानुसार जेवण केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यात हलकं आणि लवकर पचन होईल असं जेवण केलं पाहिजे. तसेच उन्हाळ्यात तरल पदार्थ आणि थंड पदार्थांचं अधिक सेवन केलं पाहिजे. हिवाळ्यात गरम पदार्थ खाल्ले पाहिजे. तर हिवाळ्यात शिळे आणि थंड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
जमिनीवर बसून खावे
आयुर्वेदानुसार, नेहमी जमिनीवर बसूनच जेवण केलं पाहिजे. जमिनीवर बसून जेवण केल्याने अन्न चांगल्या प्रकारे पचन होतं. असं केल्यास शरीराला अन्नातील पोषक तत्व चांगले मिळते.
एकदाच भरपूर खाऊ नये
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक नेहमीच सकाळचा नाश्ता स्किप करतात आणि दुपारी एकत्र भरपूर जेवण करतात. आयुर्वेदात असं सांगण्यात आलं आहे की, कधीही एकाचवेळी भरपूर जेवण करू नये. एकाचवेळी भरपूर खाल्ल्याने पचन तंत्रावर अधिक दबाव पडतो आणि अन्न पचन होण्यास अडचण येते. आयुर्वेदानुसार, नेहमी भूकेपेक्षा थोडं कमी खायला हवं.
अन्न चावून चावून खावे
काही लोकांना घाईघाईने जेवण करण्याची सवय असते. पण ही पद्धत चुकीची आहे. आयुर्वेदानुसार, अन्न नेहमी चांगलं चावून चावून खाल्लं पाहिजे. असं केल्याने अन्न चांगल्याप्रकारे पचन होतं आणि त्यातून शरीराला पोषण मिळतं.
जेवण करताना पाणी पिऊ नये
काही लोकांना जेवण करताना सतत पाणी पिण्याची सवय असते. पण असं करणं चुकीचं आहे. आयुर्वेदानुसार, जेवण करताना पाणी प्यायल्याने पचन चांगल्याप्रकारे होत नाही. अशात पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. आयुर्वेदानुसार, जेवणाच्या साधारण ४० मिनिटांआधी आणि जेवण केल्यावर ३० मिनिटांनी पाणी प्यावे.
जेवण झाल्यावर चालणे
आयुर्वेदानुसार जेवण झाल्यावर थोडा वेळ पायी चालावे. जेवण केल्यावर लगेच लेटल्याने किंवा एकाच जागेवर बसून राहिल्याने अन्न व्यवस्थित पचन होत नाही. अशात लठ्ठपणा आणि पचनासंबंधी समस्या होतात.