कोरोनाचा कहर आता जरा कमी झाला असला, तरी कोरोनानंतर डायबेटीज झाल्याची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहतो. जर असा त्रास होत असेल, तर त्यावर तुळशीची पाने आणि पनीर फूल म्हणजेच पनीर डोडा यांचा इलाज करता येतो, असे आपण हल्ली बऱ्याच जणांकडून ऐकतो. पण या दोन गोष्टी खरोखरंच लाभदायी आहेत का, त्यांचा वापर कसा करावा, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे.
कोरोना झाल्यावर अनेक जणांना रेमडेसिविर आणि त्यासोबतच अन्य औषधी द्याव्या लागतात. ही औषधे अतिशय हेवी असतात. त्यामुळे अनेकांना औषधांचे हेवी डोस सहन होत नाहीत. याचाच परिणाम तब्येतीवर होतो आणि त्यातूनच मग अनेक जणांना कोरोनानंतरचा डायबेटीज उद्भवतो. किंवा ज्यांना आधीपासूनच शुगरचा त्रास असेल, त्यांचा तो त्रास वाढतो. त्यामुळे मग शुगर कंट्रोल करण्यासाठी उपचार घेण्याची गरज निर्माण होते. ॲलोपॅथी औषधांचा त्रास कोरोनाकाळात सहन केल्यानंतर मग अनेक जण आयुर्वेदाकडे वळतात.
आरोग्यदायी तुळशीचे पान
तुळस ही घरोघरी असते. आयुर्वेदातही तुळशीच्या पानांचे खूप महत्त्व सांगितले आहे. तुळशीच्या पानांचा योग्य वापर केला तर त्याचा चांगला फायदा होतो. तुळशीचे सेवन जसे श्वसनाचे अनेक विकार कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते, तशीच ती डायबेटीज नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयूक्त आहे, असे डॉक्टर सांगतात.
पनीर फूल म्हणजे काय?
अश्वगंधा जातीत मोडणारे हे एक झाड आहे. ही फूलेही मधुमेहाच्या रूग्णांसाठी उपयुक्त आहेत, असे सांगितले जाते. मधुमेहासह अनिद्रा, अस्थमा यांच्यसाठीही पनीर फूल उपयूक्त आहे. पनीर फूल हे मधुमेहावर उपयोगी पडते. परंतु कोणत्या कारणाने मधुमेह झाला आहे, याचे निदान होणे गरजेचे आहे. त्यामुळे इतरांकडून मिळालेल्या माहितीवरून थेट पनीर फूलाचे वेगवेगळे उपचार सुरु करू नयेत. आयुर्वेदात त्याचा उल्लेख नाही. केवळ अनुभव ज्ञानातून पनीर फूल मधुमेहावर उपयोगी पडते, असे म्हटले जाते.
- वैद्य सोहन पाठक
तुळशीचे पान पाण्यात उकळून घ्यावे. गरम भातावर तुळशीची पाने ठेवावी. ५ मिनिटांनंतर पाने काढून भात खावा. यातून औषधांचा झालेला परिणाम दूर होतो. शुगर कमी होते. दिवसभरात तुळशीचे एखादे पान खावे. पानांचा काढा घेणे योग्य नाही. कारण पानात लेड असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच तुळशीचा औषधी उपयोग करावा.
- वैद्य संतोष नेवपूरकर.