ॲसिडीटी म्हणजेच अपचनाची समस्या. छातीत जळजळ होणे, डोकेदुखी, उलट्या आणि शरीरातील आम्ल उफाळून वर येणे यालाच आपण सोप्या भाषेत ॲसिडीटी झाली किंवा पित्त झालं असं म्हणतो. झोपेच्या आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा, ताणतणाव, आहारातील बदल, व्यसनं यामुळे ॲसिडीटीची समस्या उद्भवते. मग आपण ही ॲसिडीटी कमी करण्यासाठी एकतर घरगुती उपाय करतो किंवा काही औषधे घेतो. पण अशी औषधे घेणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. ॲसिडीटीचा शरीरातील इतर अवयवांवरही परीणाम होतो. याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही (Heart attack Symptoms Causes and Lifestyle Factors).
ॲसिडीटीचा यकृत, हृदय यांच्यावर दिर्घकालिन परीणाम होत असतो. त्यामुळे तुम्हालाही सतत ॲसिडीटी होत असेल तर तुम्ही सावध राहायला हवे. कार्डिॲक अरेस्ट किंवा हार्ट ॲटॅक या गेल्या काही वर्षात अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ५० ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तींना हृदयाशी निगडीत समस्या उद्भवत होत्या पण आता ऐन २०-३० वर्षाच्या व्यक्तींनाही हृदयरोगाचा झटका येण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. हार्ट ॲटॅकपासून दूर राहायचे असल्यास काय करावे याविषयी...
१. लाईफस्टाइलमध्ये सुधार गरजेचाच
व्यायाम करत नसाल तर तुम्हाला हार्ट ॲटॅकचा धोका जास्त असतो असे आपण पूर्वी म्हणायचो. मात्र आता जीममध्ये जाऊन नियमित व्यायाम करणाऱ्यांमध्येही हा धोका वाढल्याचे दिसते. त्यामुळे ताणतणावांचे नियोजन, जंक फूडचे सेवन कमीत कमी करणे, नियमित व्यायाम, व्यसनांचे प्रमाण यांसारख्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
२. हृदयरोगाला कारणीभूत इतर गोष्टी
केवळ व्यायाम किंवा आहार या गोष्टींमुळेच हृदयरोगाचा धोका वाढतो असे नाही तर ताणतणाव, बीपी, शुगर, लठ्ठपणा, अपुरी झोप यांसारख्या समस्यांमुळेही हृदयरोगाचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडेही गांभिर्याने लक्ष द्यायला हवे.
३. व्यायाम
नियमित व्यायाम करायला हवा हे आपल्याला वारंवार सांगितले जाते किंवा आपल्याला ते पटतही असते. पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र खूप काळ जावा लागतो. व्यायामाला सुरुवात करणारे खूप जण असतात पण त्यामध्ये सातत्य ठेवणे जास्त महत्त्वाचे असते. व्यायामाने स्नायू, हाडं, शरीराची एकूण सिस्टीम बळकट होण्यास मदत होते आणि हृदयाचे कार्यही सुरळीत होण्यास त्याचा चांगला फायदा होतो.
४. आहारात बदल गरजेचा
हृदयरोगाचा धोका उद्भवू नये असे वाटत असेल तर आहारात भात, साखर, मीठ यांचे प्रमाण मर्यादेत ठेवायला हवे. जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खाण्यावर योग्य ते निर्बंध घालायला हवेत. आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवायला हवे. यासाठी डाळी, कडधान्य, फळं, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा आहारात समावेश वाढवायला हवा.