घरोघरच्या महिलांना घर, ऑफिसची जबाबदारी सांभाळण्यामुळे स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही. आता पूर्वीसारखी परिस्थिती न राहता जास्तीत जास्त महिला घर सांभाळून कामासाठी बाहेर पडतात. त्यामुळे कामाचा वाढता दबाव ताण तणाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळ हार्ट अटॅक, स्ट्रोकसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे. युरोपियन स्ट्रोक ऑर्गनायझेशनमध्ये सादर केलेल्या अभ्यासानुसार, कामाचा दबाव आणि झोपेची कमतरता यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये धोका जास्त
मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपान आणि लठ्ठपणा सामान्यतः हृदयरोगाच्या जोखमीमध्ये सामील असतात. अभ्यासानुसार, कामाचा दबाव, तणाव, झोपेच्या विकारांमुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.
अभ्यासाच्या लेखकांचे म्हणणे आहे की सामान्यत: स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा जास्त त्रास असतो. पण आता काही देशांमध्ये महिलांनी पुरुषांना या प्रकरणात मागे सोडले आहे. कामाचा ताण महिलांना हृदयरोगाच्या धोक्याची सुचना देत आहे.
ताण आणि थकवा महत्वाचं कारण आहे
अभ्यासात असे आढळून आले की पुरुषांमध्ये धूम्रपान, लठ्ठपणाच्या केसेस जास्त असल्यातरी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या सर्वाधिक घटना स्त्रियांमध्ये दिसून आली. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ज्यूरिचचे न्यूरोलॉजिस्ट डॉ मार्टिन हॅन्सेल आणि त्यांच्या टीमचे म्हणणे आहे की, स्त्रियांमध्ये या गंभीर आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे ताण, झोपेचे विकार आणि कामाच्या ठिकाणी थकवा जाणवत आहे.
फूल टाईम जॉब करत असलेल्या स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त
आश्चर्याची बाब म्हणजे पूर्ण वेळ काम करणाऱ्या महिलांमध्ये या आजारांचा धोका सर्वाधिक दिसून आला आहे. तज्ज्ञांच्या मते ऑफिसमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांवर घर आणि ऑफिसची काळजी घेण्याचा दबाव तीन ते चार तास काम करणाऱ्या महिलांपेक्षा जास्त असतो.
थकवा आणि झोपेच्या विकारांमध्ये वाढ
संशोधकांनी 2007, 2012 आणि 2017 च्या स्विस आरोग्य सर्वेक्षणातील 22,000 महिला आणि पुरुषांच्या डेटाची तुलना केली. यामध्ये त्यांना आढळले की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी जोखीम घटकांची तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या चिंताजनक वाढली आहे. एकूणच, कामाचा ताण घेणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांची संख्या 2012 मध्ये 59 टक्क्यांवरून 2017 मध्ये 66 टक्के झाली.
काम केल्यानंतर थकल्यासारखे वाटणाऱ्या लोकांची संख्या 23 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या काळात झोपेच्या विकारांची संख्या 24 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत वाढली. पुरुषांमध्ये झोपेच्या विकारांचे प्रमाण 5 टक्क्यांनी वाढले आहे, तर महिलांमध्ये ते 8 टक्क्यांनी वाढले आहे.
या संशोधनानंतर हे स्पष्ट झाले आहे की आता हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यापुढे पुरुषांशी संबंधित रोग नाहीत, परंतु जर काळजी घेतली नाही तर कामाच्या दबावामुळे स्त्रिया देखील या गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. तज्ञांच्या मते, अशा परिस्थिती टाळण्यासाठी, महिलांनी काम करताना कमी ताण घेण्याची आणि चांगल्या झोपेची गरज आहे.