Join us   

ऐन तारुण्यात हार्ट अटॅक, आणि सगळंच संपतं; काय त्याची कारणे, ती टाळता येतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 2:45 PM

पूर्वी पन्नाशीत किंवा साठीत येणारा हार्टअॅटॅक आता तिशी-चाळीशीतच येतो. कमी वयात येणाऱ्या हार्ट अॅटॅकची कारणे काय? काय उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते याविषयी...

ठळक मुद्दे वेळीच जागे व्हा, योग्य ती काळजी घ्या आणि हार्ट अॅटॅकपासून दूर राहाजीवनशैली आणि मानसिक अवस्था यांचे संतुलन असेल तर हृदयावर ताण येणार नाही

प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचा नुकताच हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. त्यांचे वय अवघे ४६ होते. मागच्या महिन्यात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचाही अवघ्या ४० वर्षाचा असताना हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. इतक्या कमी वयात हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले असून यामागील नेमकी कारणे काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. पूर्वी वयाच्या साठीत उद्भवणारे हे आजार आता ऐन तिशीत आणि चाळीशीतच उद्भवू लागले आहेत. भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून त्यात तरुणांचे प्रमाण जास्त असल्याचे गेल्या काही वर्षात समोर आले आहे. बदलती लाइफस्टाईल आणि मानसिक ताणतणाव हे यामागील मुख्य कारण असले तरी वेळीच आपण जागे झालो नाही तर येत्या काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होईल यात शंका नाही.    

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय ? 

हृदयाला रक्तुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने ब्लॉकेजेस झाले तर हा रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हृदयाच्या कामात अडथळा निर्माण होतो. ही समस्या साधारणपणे लक्षात येत नसल्याने वयाच्या तिशीनंतर दर एक ते दोन वर्षांनी मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे. या माध्यमातून आपल्याला काही त्रास असल्यास तो वेळीच लक्षात येतो आणि उपचार करणे सोपे होते. रक्ताच्या माध्यमातून हृदयाला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर ही समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा, बीपी, मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या असतील तर वेळच्यावेळी तपासण्या आणि औषधोपचार करणे गरजेचे आहे.  हार्ट अॅटॅक अत्यंत तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो, पहिल्या तासात रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते. यावेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो.  

( Image : Google)

काय आहेत कमी वयात हृदयविकाराची कारणे 

१. मानसिक ताण - गेल्या काही वर्षांत एकूणच सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये मानसिक ताण वाढल्याचे चित्र आहे. तरुणांमध्ये करीयर, नातेसंबंध, कुटुंब, सामाजिक दबाव यांसारख्या गोष्टींमुळे ताणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. त्याचाच परीणाम म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे येणारे नैराश्य आणि त्याचा शरीरावर होणारा विपरित परिणाम

२. मोबाईल अॅडिक्शन - मोबाइल हा सध्या प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरज झाला आहे. मोबाइलशिवाय जगणे अवघड आहे असेच आताच्या तरुण पिढीला वाटत आहे. सतत सोशल मीडियाचा वापर, नकारात्मक बातम्या यांमुळे दिवसाचा आणि रात्रीचाही जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर जातो. सतत एका जागेवर बसून राहिल्याने कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण, ब्लॉकेजेस, शुगर, लठ्ठपणा या समस्या वाढतात आणि नकळत हृदयावर त्याचा ताण येतो. 

३. व्यायामाचा अभाव - दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. व्यायामाला वेळच नाही असे कारण अनेकदा दिले जाते. मात्र त्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारासारख्या समस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते. 

( Image : Google)

४. आनुवंशिकता - तुमच्या कुटुंबात आई-वडिलांपैकी कोणाला हृदयाशी संबंधित आजार असतील तर तुम्हालाही ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आपल्या गुणसूत्रांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आधीपासूनच योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

५. फास्टफूडचे सेवन - सध्या बाहेरचे आणि फास्टफूड खाण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढल्याचे दिसते. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहावे लागणे आणि त्यामुळे जास्तीत जास्त बाहेर खाणे यामुळे शरीरावर वाईट परिणाम होताना दिसतात. शरीलाला योग्य ते पोषक घटक न मिळाल्यास प्रतिकारशक्ती कमी होत जाते. तसेच स्नायूंची ताकदही कमी होत जाते. त्यामुळे जीवनशैलीशी निगडित अनेक समस्या उद्भवतात आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या हृदयावर होतो. 

६. अनियमित जीवनशैली - हल्ली कामाचा ताण इतका जास्त आहे की रात्री उशीरापर्यंत ऑफीसचे काम केले जाते. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. अशा कोणत्याच गोष्टींच्या वेळा निश्चित नसल्याने आयुष्याला शिस्त राहात नाही. त्यामुळे अॅसिडीटी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या या समस्या कालांतराने उग्र रुप धारण करतात. 

त्यामुळे तुम्हाला हृदयरोगापासून वाचायचे असेल तर वेळीच आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, व्यायाम, आहाराचे संतुलन, सकारात्मक आणि आनंदी वातावरण, व्यसनांपासून दूर राहणे यासारख्या गोष्टींमुळे आपण हृदयविकारापासून काही प्रमाणात दूर राहू शकतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग