Join us   

दिवसा ऊन, सकाळी-रात्री थंडी, ऋतु बदलामुळे थंडी तापाने हैराण? ८ उपाय, लवकर वाटेल बरं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 12:59 PM

ऐन दिवाळीच्या तोंडावर ताप-सर्दीने बेजार असाल तर योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणजे वेळेत बरे होऊन दिवाळीचा आनंद घेऊ शकाल. नाहीतर वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणात झोपून राहावे लागेल.

ठळक मुद्दे दिवाळी छान साजरी करायची असेल तर वेळीच उपचार करा आणि लवकर बरे व्हानुसता सर्दी-खोकला म्हणून दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

ऑक्टोबर हिट संपून अचानक हवेतील गारवा वाढायला लागला आहे. दिवाळी आणि गारवा यांचे एक वेगळेच गणित असते. दिवाळीच्या दिवसांत पहाटेच्या थंडीत उठून केलेले अभ्यंगस्नान आणि त्यानंतर नवनवीन कपडे घालून फटाके उडवणे, फराळ करणे ही मजा काही औरच. हे सगळे खरे असले तरी या बदलत्या हवामानामुळे सध्या ताप-सर्दी आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. दिवसा ऊन आणि रात्री आणि सकाळी थंडी  यामुळे सणाचा आनंद लुटण्याचे प्लॅन्स मागे पडतात की काय अशी परिस्थिती सध्या अनेक कुंटुंबात पाहायला मिळत आहे. आताच कोविडचे संकट काहीसे ओसरले म्हणत असताना डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. साध्या सर्दी-तापाने आजारी असणाऱ्या रुग्णांची संख्याही झापाट्याने वाढत आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच सर्दीने बेजार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळीच योग्य ते निदान करणे आणि औषधोपचार करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या सणाची मजा लुटायची असेल तर कोणती योग्य ती काळजी घ्यायला हवी याविषयी...

१. फ्लू ही अशी गोष्ट आहे की नेमके काय झाले हे समजायला वेळ लागतो. आपल्याला सर्दी ताप आला आहे हे समजायलाच २ ते ३ दिवस जातात. यातील बरीचशी लक्षणे ही सामान्य सर्दी-तापासारखी दिसत असल्याने नेमके कोणत्या पद्धतीचे उपचार करायचे याबाबत डॉक्टरांमध्येही अनेकदा संभ्रम असल्याचे दिसते. यातून पूर्ण बरे होण्यासाठी साधारणपणे २ आठवडे लागू शकतात. 

२. आपल्याला कोविड नसून नुसता फ्लू असला तरीही घराबाहेर पडणे टाळा. कारण तुम्ही घराबाहेर पडलात तर तुमचा त्रास तर वाढेलच पण इतरानांही हा त्रास होण्याची शक्यता असू शकते. फ्लूमुळे तुम्हाला थकवा आलेला असतो आणि त्यातच तुम्ही बाहेर पडलात तर हा थकवा कमी होण्याऐवजी वाढत जातो. अशावेळी घरात थांबणे, हलका आहार घेणे आणि जास्तीत जास्त आराम करणे हा लवकर बरे होण्यासाठी उत्तम उपाय आहे. 

३. जास्तीत जास्त पाणी पिणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. डिहायड्रेशनमुळे रिकव्हरी व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे दर काही वेळाने पाणी किंवा सरबत, ओआरएस असे पेय प्यावे. तुम्ही दिवसातून किमान २ लिटर पाणी पित आहात याची खात्री करा. तसेच चहा, कॉफी यांसारखी पेय जास्त प्रमाणात प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा जास्त त्रास होऊ शकतो, त्यामुळे कमीत कमी चहा-कॉफी घ्या.

४. साधा फ्लूच आहे आरामाने बरा होईल असे म्हणून औषधे घेणे टाळू नका. किंवा डॉक्टरांकडे जायचे टाळून मेडिकल स्टोअरमधून औषधे आणू नका. असे करणे तोट्याचे ठरु शकते. डॉक्टर तुम्हाला नेमके काय झाले आहे हे विचारुन लक्षणांवरुन त्यानुसार औषधे देत असतात. त्यामुळे वेळीच त्यांच्याकडे जाऊन योग्य ती औषधे घ्या. 

( Image : Google)

५. तुम्हाला आधीपासून बीपी, शुगर, हृदयाशी संबंधित समस्या असे काही आजार असतील तर हा साधा फ्लू तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतो. फ्लूमुळे तुमच्या इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर चाचण्या करुन त्याचे औषधोपचारही वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने करा

६. खोलीत उबदार वातावरण राहील असे बघा. खोलीला गॅलरी असेल तर दार लावून ठेवा. त्यामुळे थेट वाऱ्याशी तुमचा संपर्क येणार नाही. तसेच खोलीला खिडक्या असतील तर केवळ थोडी हवा खेळती राहील इतक्याच खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे खोली उबदार राहून तुम्हाला लवकर बरे वाटण्यास मदत होईल. 

७. हलका आणि सहज पचेल असा आहार घ्या. यामध्ये मऊसर खिचडी, वरण-भात, पेज, सूप यांसारख्या आहाराचा समावेश असावा. आजारपणात आपली विशेष हालचाल होत नसल्याने अन्न पचत नाही. अशावेळी जड आहार घेतला तर तो पचण्यास अवघड होतो. त्यामुळे हलका आहार घेतलेला केव्हाही चांगला. तसेच चिप्स किंवा जंक फूड खाणे टाळा. त्यामुळे तुमची ताप-सर्दीची समस्या कमी होण्यास जास्त वेळ लागू शकतो. जंक फूडमधून शरीराला आवश्यक असणारे घटक मिळत नाहीत, त्यामुळे ते खाणे टाळा.

८. फ्लू हा वरवर साधा वाटणारा आजार असला तरीही त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे फ्लू आहे म्हणून नुसतेच पडून न राहता योग्य ती काळजी घेऊन औषधोपचार वेळेत सुरु करणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या. फ्लूमध्ये  आरोग्याची एकातून एक गुंतागुंत होऊन समस्या वाढू शकतात. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहवामान