Join us   

Holi Celebration 2022 : रंग खेळा, पण त्वचेची काळजी घेऊन; तज्ज्ञ सांगतात त्वचा खराब होऊ नये म्हणून करा १० गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 3:39 PM

Holi Celebration 2022 : एक दिवसाचा सण आणि मजा आपल्यासाठी त्रासदायक ठरु शकते. रंगाचा केस आणि त्वचेशी संबंध येत असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे अंगाचा रंग निघत नसेल तर हा रंग काढून टाकण्यासाठी होळीच्या एका आठवड्यानंतर कोणीही डिटॅन किंवा एक्सफोलिएटिंग उपचार घेऊ शकतात.त्वचा आणि केस जास्त जोराने स्क्रब करणे टाळा कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते.

मागच्या दोन वर्षांपासून आपण सगळेच कोरोनामुळे मनसोक्त सण-समारंभ सेलिब्रेट करु शकलो नाहीत. मात्र या वर्षी कोरोनाचे सावट काहीसे कमी झाल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होळी आणि रंगपंचमीसारखा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार (Holi Celebration 2022). सण हे आनंद पसरवण्यासाठी असल्याने त्याचा आपल्या आरोग्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवसाचा सण आणि मजा आपल्यासाठी त्रासदायक ठरु शकते. रंगाचा केस आणि त्वचेशी संबंध येत असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हात पाणी आणि रंग खेळताना (Rangpanchami) कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे याविषयी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. श्रद्धा देशपांडे काही महत्त्वाच्या टिप्स देतात...

(Image : Google)

1. होळीच्या आधी त्वचेचे कोणतेही उपचार टाळा- वॅक्सिंग, ब्लीचिंग, फेशियल, पील्स, लेसर या प्रक्रियेनंतर त्वचा असुरक्षित असते. तसेच या प्रक्रियांमुळे त्वचेची रंध्रे ओपन होतात आणि त्यावर केमिकलचे रंग लागल्यास जळजळ होणे, फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून पार्लर ट्रीटमेंट झाल्यावर रंग खेळणे टाळावे. 

2. रंग खेळण्यापूर्वी त्वचेला आणि केसांना तेल लावा. नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल त्वचेवर एक संरक्षणात्मक कवच बनवते आणि त्वचेचे संरक्षण करते. तसेच अनेकदा रंगांचे डाग जात नाहीत. अशावेळी तेलाचा थर असल्यास हे रंग सहजपणे निघण्यास मदत होते.

3. शक्यतो सेंद्रिय आणि नैसर्गिक रंग वापरा. ज्यामुळे त्वचेबरोबरच डोळे, तोंडात गेले तरी पोटाला त्रास होणार नाही. होळी खेळताना सिंथेटिक आणि गडद रंगांचा, ऑईल पेंट किंवा क्रिस्टल रंग वापरणे टाळा.

4. घराबाहेर खेळताना एसपीएफ़ 40 प्लस असलेले सनस्क्रीन संपूर्ण शरीराला लावा. ज्यामुळे त्वचा उन्हापासून आणि रंगांपासूनही सुरक्षित राहण्यास मदत होईल. हे सनस्क्रीन वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या.

5. त्वचेचे रक्षण करण्यासाठी सैल, शक्यतो सुती कपडे घाला. सिंथेटीक, सिल्क किंवा डेनिमचे कपडे घालणे टाळा. ओले झाल्यानंतर खूप वेळ तसेच राहू नका, नाहीतर त्यावर हवा बसून किंवा ओलावा शरीरात मुरून आजारी पडण्याची शक्यता असते. 

6. तुमचे केस शक्यतो झाकून ठेवा किंवा पोनीटेल घाला. त्यामुळे केसांत रंग अडकणार नाही. कारण केसातला रंग काढणे वाटते तितके सोपे नसते. तसेच या रंगाने केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. 

7. कडक सूर्यप्रकाशात खेळताना शरीर हायड्रेट राहील याची काळजी घ्या.  उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, होळीच्या दिवशी मिठाई आणि थंडाई खा, तसेच ताजी फळे आणि सॅलडचे सेवन करा.

(Image : Google)

8.खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि सौम्य साफ करणारा साबण वापरा आणि केसांना सौम्य शॅम्पूने धुवा. तसेच कंडिशनर वापरण्यास विसरू नका. त्वचा आणि केस जास्त जोराने स्क्रब करणे टाळा कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते.

9. रंगपंचमीनंतर काही दिवस जाऊनही अंगाचा रंग निघत नसेल तर हा रंग काढून टाकण्यासाठी होळीच्या एका आठवड्यानंतर कोणीही डिटॅन किंवा एक्सफोलिएटिंग उपचार घेऊ शकतात.

10. आपली त्वचा निरोगी आणि सतेज राहावी यासाठी कोरफड किंवा कॅलेंडुला असलेले जेल आवर्जून वापरा. याने मॉइश्चरायझरसह मॉइश्चरायझिंग करण्यास विसरू नका. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोळी 2022त्वचेची काळजी