सकाळच्या घाईत किंवा एरवीही काम करत असताना घरातल्या महिलेच्या किंवा मुलांच्या अंगावर अचानक गरम पाणी, चहा किंवा गरम पदार्थ असं काहीतरी सांडतं. चटका बसतो, मोठ्या प्रमाणात भाजतंही. लहानसहान चटका बसला तर तात्पुरती आग होते, थोडं पोळलं म्हणून आपण दुर्लक्षही करतो. पण गरम पदार्थ अंगावर सांडून भाजण्याचे प्रमाण मोठे आहे. आग होते म्हणून काहीजण अघोरी उपाय करतात. भाजलेल्या जागेवर कणीक लावतात, मिळेल ते मलम चोपडतात. मात्र असं करु नये त्यामुळे भाजलेल्या जागी इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. जास्त भाजलं तर तातडीने डॉक्टरकडे जायला हवंच पण प्रथमोपचार म्हणून तातडीने काही गोष्टी करायला हव्या. काय करायचं पटकन पाहा..
१. पाण्याखाली धरणे
गरम पाण्यामुळे साधारणपणे हात किंवा पाय भाजतो. हा भाजलेला भाग लगेचच पाण्याखाली धरला तर त्यामुळे भाजलेल्या भागाला आराम मिळण्यास मदत होते. पाण्याखाली म्हणजे वाहत्या पाण्याखाली १० ते १५ मिनीटे हात धरल्यास भाजलेल्या भागाला आराम मिळण्यास मदत होते. चटका कमी होतो आणि त्वचेचे तापमान सामान्य होण्यास याचा उपयोग होतो.
२. मलम लावणे
हात किंवा भाजलेला भाग पाण्याखाली धरल्यानंतर त्याला घरात असलेले अँटीबायोटीक ऑइनमेंट लावा. पण ते हलक्या हाताने पातळ थर लावा. आपल्या घरात एखादे क्रिम जरुर असते. काहीच नसेल तर कोरफडीचा गर किंवा कोको बटर लावा. यामुळे भाजलेल्या भागाची आग कमी होण्यास मदत होते.
३. दागिने कपडे काढून टाका
भाजलेल्या भागावर वेदना होत असते. याठिकाणी चुकून काही दागिने, बेल्ट असे काही असेल तर तो भाग आधी मोकळा करावा. त्यामुळे त्यावर पुढचे उपाय करणे सोपे होते आणि बांधल्यासारखे होत नाही. भाजलेला भाग काही काळ उघडा ठेवावा.
४. काय टाळावे?
भाजलेल्या जागी कणिक, दही, मध लावू नये. त्यामुळे जखम जास्त चिघळू शकते, इन्फेक्शन होते. या गोष्टींच्या खपल्या धरल्यानं फोड अवेळी फुटतात. भाजलेल्या जागी आलेले फोड नखाने किंवा सुई किंवा अन्य अणकुचीदार गोष्टींनी फोडू नयेत. डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार करुन घ्यावे.