'अगं बाई हे करायचं होतं... पण लक्षातच राहिलं नाही..', 'अरे देवा आज अमूक करायला विसरलेच की मी...', किंवा... 'हल्ली ना माझ्या डोक्यातच काही राहत नाही बघ.....' अशी काही वाक्य आपण आपल्या मैत्रिणींकडून नेहमीच ऐकत असतो.. किंवा बऱ्याचदा आपणच ती बोलत असतो.. असं सारखं सारखं विसरायला होत असेल ना तर या काही सोप्या सोप्या गोष्टी करायला सुरुवात करून टाका. बघा सगळं विसराळूपणा कमी होईल आणि सगळं व्यवस्थित लक्षात राहील.
१. मेमरी गेम खेळा.. (memory game) विसराळूपणा वाढला असेल तर घरच्याघरी अनेक मेमरी गेम खेळता येतात. जसे की... - १०० ते १ असे उलटे आकडे लिहून काढणे आणि हळूहळू लिखाणाची स्पीड वाढवणे. - ५ ते १० मिनिटांसाठी उलटे चालणे - राेज रात्री झाेपताना आज दिवसभरात आपण काय काय केलं आहे ते आठवायचं. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. - आज काय भाजी खाल्ली, काय काय, परवा काय, त्याच्या आधी काय असं साधारण मागच्या ७ ते ८ दिवसांचं आठवायचा प्रयत्न करायचा. - एका कागदावर कोणत्याही १० गोष्टी लिहून ठेवायच्या. त्यानंतर एक तासाने तो कागद न बघता आपण त्यात काय लिहिलं आहे हे आठवण्याचा प्रयत्न करायचा. - पाढे म्हटल्यानेही लक्षात ठेवण्याची क्षमता वाढत जाते, असं म्हणतात. त्यामुळे अगदी २ च्या पाढ्यापासून सुरुवात करा आणि जेवढे पाढे येतील, तेवढे लिहा किंवा म्हणा.
२. डान्स शिका आणि करा.. (learning dance) डान्स ही अशी कला आणि व्यायाम आहे जो करताना आपल्या संपूर्ण शरीराचं, मनाचं आणि डोक्याचं कनेक्शन एकमेकांशी असणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे डान्स शिका. आपोआपच तुमच्याकडून स्टेप्स लक्षात ठेवल्या जातील. मेंदूला चालना मिळेल. डान्स केल्यामुळे एकाग्रता वाढते, असंही सांगितलं जातं.
३. गाणी म्हणा...(singing songs) ज्याप्रमाणे पाढे पाठ करण्याचं सूत्र कामास येतं.. त्याचप्रमाणे गाणी पाठ केल्यानेही फायदा होतो. तुम्हाला जी आवडतील ती गाणी लावा. रोज ऐका आणि हळूहळू त्या गाण्यासोबत तुम्हीही गुणगुणायला सुरुवात करा.. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतो.