अॅसिडीटी हा अशी समस्या आहे की ज्यांना होते त्यांनाच त्याचे दु:ख कळते. एकदा अॅसिडीटी झाली की त्यामुळे होणारी जळजळ, मळमळ, उलट्या आणि पोटात होणारी कालवाकालव असह्य असते. यामुळे डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, करपट ढेकर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर वातावरणामुळे हा त्रास जास्त होत असल्याने अनेक जण हैराण असतात. (Home Remedies For Acidity) एकदा अॅसिडीटी झाली की काय करावे काहीही सुचत नाही. मग एकतर उलट्यांमधून ही अॅसिडीटी बाहेर पजते किंवा अंगावर लाल फोड येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकांची अॅसिडीटी ही बाहेर पडत नसल्याने त्यांना तर आणखी त्रास होतो.
अपुरी झोप, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि पचनाशी निगडित तक्रारी यांमुळे आपल्याला अनेकदा अॅसिडीटी झाल्याचे दिसते. अॅसिडीटी झाल्यावर गोळ्या जेलोसिल, ओमेझ, पुदीनहरा अशी औषधे सर्रास घेतली जातात. पण या औषधांचे भविष्यात आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय करता येतात. हे उपाय केल्याने अनेकदा आराम मिळत असल्याने डॉक्टरांकडे जाण्याचीही वेळ येत नाही. पाहूयात सहज करता येतील असे उपाय कोणते.
१. आलं
आलं हा अॅसिडीटीवरील सर्वात उत्तम उपाय असून आलं ठेचून किंवा किसून त्यामध्ये मीठ घालून ते कच्चे खावे. आलं थोडं तिखट असल्याने यामध्ये थोडी साखर घातली तरी चालते. यामुळे अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते.
२. आवळा
आवळा हा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय असून अॅसिडीटी झाल्यावर आवर्जून मोरावळा, आवळा कॅंडी, आवळा सरबत असे काही ना काही घ्यायला हवे. हल्ली बाजारातही आवळा कँडी किंवा मोरावळा अगदी सहज उपलब्ध असतो. त्यामुळे आपल्याला अॅसिडीटीचा त्रास असेल तर हे नियमित खायला हवे.
३. दूध किंवा आईस्क्रीम
गार दूध किंवा आईस्क्रीम खाल्ल्याने शरीरातील खवळलेले पित्त कमी होण्यास मदत होते. शरीराला थंडावा मिळाल्याने अॅसि़डीटीमुळे होणारी मळमळ, उलट्या कमी होतात. दूध घरात सहज उपलब्ध असते. तसेच आपण बाहेर असू तर उन्हाळ्याच्या दिवसांत एखादे आईस्क्रीम नक्की खायला हवे.
४. गोड पदार्थ
अनेकदा गोड खाल्ल्यानेही अॅसिडीटी कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी घरात असलेला गोड पदार्थ खावा. काहीच नसेल तर गूळ, साखर यांपैकी काहीतरी तोंडात टाकावे. यामुळे काही वेळाने नक्की आराम मिळतो.
५. काय टाळावे?
सतत अॅसिडीटी होत असेल तर चहा, कॉफी कमी प्रमाणात घ्यायला हवे. इडली, डोसा, चाट यांसारख्या आंबट गोष्टींचे प्रमाण आहारात कमी करायला हवे. पालेभाज्या, तूर डाळ यांमुळेही अनेकदा अॅसि़डीटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी टाळायला हव्यात. तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.