Join us   

थंडी वाढल्याने तुम्हालाही कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 1:14 PM

Home Remedies for Constipation Problem in Winter : बद्धकोष्ठता होणं ठिक असलं तरी हा त्रास सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत.

ठळक मुद्दे आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास मल मोकळा होण्यास त्याचा चांगला फायदा होतो.थंडीत ही समस्या सामान्य असली तरी त्यावर वेळीच उपाय करायला हवेत...

पोट वेळच्या वेळी साफ होणं ही चांगल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण पोट साफ नसेल तर बद्धकोष्ठता, गॅसेस, मूळव्याध, वजन वाढणे किंवा कमी होणे, ऍसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. जीवनशैलीतील चुकीच्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यास अडचणी येतात. कोरडे, थंड, मसालेदार, तळलेले आणि फास्ट फूडचे अतिसेवन, पुरेसे पाणी न पिणे, अन्नामध्ये कमी फायबर, खराब चयापचय, झोप न लागणे, रात्री उशिरापर्यंत खाणे इ. गोष्टींचा समावेश असतो. थंडीच्या दिवसांत तर बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टीपेशन होणे अतिशय सामान्य असते. अधूनमधून बद्धकोष्ठता होणं ठिक असलं तरी हा त्रास सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत (Ayurvedic Home Remedies For Constipation Problem). 

(Image : Google)

बद्धकोष्ठतेसाठी किंवा पोट वेळच्या वेळी साफ व्हावे यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय करून पाहू शकतो. आयुर्वेदीक उपचारांमुळे साईड इफेक्टस होण्याची शक्यता नसल्याने अनेक जण हे उपाय करणे पसंत करतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे थंडीच्या दिवसांत होणाऱ्या बद्धकोष्ठतेसाठी काही घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, थंडी मुळे नकळत आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते यामुळे मलातील द्रवगुण कमी होतो व कठीण मलप्रवृत्ती होण्यास सुरुवात होते. यामुळे बद्धकोष्ठता, अर्श व फिशरचे रुग्ण वाढू लागतात. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय...

बद्धकोष्ठता होत असेल तर...

१. नियमित व्यायाम करावा, याने पोटातील आतड्यांची हालचाल होवून मल पुढे ढकलण्यास चांगली मदत होईल.

२. थंडीच्या काळाच रात्री झोपताना कोमट दूध-तूप, कोमट पाणी यांचे आवर्जून सेवन करावे. त्यामुळे मल बाहेर पडण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास मल मोकळा होण्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे गरम सूप, वरण, सार अशा गोष्टींचा समावेश आहारात वाढवायला हवा. 

४. आहारात स्निग्धता असलेले तीळ, तीळाची चटणी, तीळाचे लाडू व काळे मनुके, तूप घ्यायला हवे.

५. वैद्यांच्या सल्याने आवश्यकतेनुसार एरंडतेल, अधिकच कठिण मल असल्यास इसबगोल यांसारखी औषधे रात्री झोपताना घ्यायला हवीत.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय