राज्यात थंडीचा जोर गेल्या काही दिवसांत वेगाने वाढला आणि पुन्हा एकदा व्हायरल इन्फेक्शनची लाट सुरू झाली. एकदा सर्दी-खोकला झाला की काहीच सुधरत नाही. नाक-डोकं तर पॅक झाल्यासारखं होतंच पण अनेकदा सर्दीमुळे श्वास घेणेही अवघड होऊन जाते. घसा खवखवणे, खोकला, कणकण, गळणारं नाक अशी काही ना काही लक्षणं आपल्याला सतावतात.
सर्दी ही अशी गोष्ट आहे की जी घरात एकाला झाली की हळूहळू सगळ्यांना होते. असं झालं की अन्नाची चव लागत नाही की काहीच काम करावेसे वाटत नाही. अशावेळी लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास ही सर्दी कमी होण्यास चांगली मदत होते. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे (Home Remedies for Cough and Cold) ?
१. वाफ घेणे
वाफ घेणे हा सर्दी आणि कफ मोकळा होण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय आहे. वाफ घेतल्याने अडकलेली सर्दी मोकळी होण्यास मदत होते. यामुळे नाक आणि डोकं जास्त चोकअप झालं असेल तर ते मोकळं होतं आणि काही वेळासाठी तरी आपल्याला बरं वाटतं.
२. गरम पाणी किंवा पेय
सर्दी आणि कफ झाला असेल तर आपल्या घशाला त्रास होतो. तसेच कफ घट्ट असेल तर तो बाहेत पडण्यातही अडचण येते. अशावेळी गरम पाणी प्यायल्यास हा कफ थोडा पातळ होण्यास मदत होते. अशावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप, सार यांचाही आहारात समावेश करु शकतो.
३. काढा
आपल्या घरात तुळस, आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध यांसारख्या गोष्टी असतात. पाण्यात या सगळ्या गोष्टी चांगल्या उकळून त्यांचा काढा प्यायला हवा. हे पदार्थ उष्ण असल्याने सर्दी कमी होण्यास याची चांगली मदत होते.