Join us   

गारठ्याने सतत कोरडा खोकला होतोय? ३ घरगुती उपाय, मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 1:16 PM

Home Remedies for Dry Cough : खोकल्याने आपला घसा आणि छातीही काहीशी दुखायला लागते. पाहूयात खोकला कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय...

ठळक मुद्दे खोकला झाला असेल तर आधी हे घरगुती उपाय करुन पाहा आणि नंतरच डॉक्टरांकडे जा.  आलं, लवंग, मध, हळद हे घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ असून त्यापासून निश्चितच आराम मिळू शकतो.

थंडीच्या दिवसांत सर्दी-कफ, खोकला, वाहणारे नाक, डोकेदुखी या समस्या उद्भवतात. हवेतील गारठा वाढल्याने उद्भवणाऱ्या या समस्यांमुळे लहानांपासून मोठेही सगळेच हैराण होऊन जातात. गारठ्यामुळे होणारी ही सर्दी लवकर बरं व्हायचे नाव घेत नाही आणि मग आपण अगदी बेजार होऊन जातो. घरातील एकाला हा संसर्ग झाला की मग हळूहळू सगळ्यांमध्येच हा संसर्ग पसरतो. सर्दी-कफ काही औषधाने किंवा ाही घरगुती उपाय केले तर कमी होतो मात्र खोकला झाला असेल तर तो कमी व्हायला बराच वेळ जावा लागतो. आता खोकला झाला म्हणून डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्यापासून आराम मिळू शकतो. काही वेळा हा खोकला इतका जास्त असतो की आपली नीट झोप तर होत नाहीच पण खोकून नंतर आपला घसा आणि छातीही काहीशी दुखायला लागते. पाहूयात खोकला कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय (Home Remedies for Dry Cough)...

(Image : Google)

१. लवंग - मध

लवंग तव्यावर किंवा कढईमध्ये चांगली भाजून घ्यायची. भाजल्यानंतर लवंग थोडी फुगते आणि पांढरट होते. गार झाल्यानंतर तिची ठेचून पूड करायची आणि एका चमच्यात ही पूड घेऊन त्यामध्ये मध घालायचा. हे चाटण घेऊन झोपल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. 

२. दूध-हळद

हळदीमध्ये अंटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे अनेकदा जखम झाल्यावरही त्याठिकाणी हळद लावली जाते. खोकला किंवा कफ म्हणजे आपल्याला इन्फेक्शन झालेले असते. अशावेळी गरम दूध आणि हळद घेतल्यास घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर यामध्ये थोडा गूळ घातला तरी ते आरोग्यासाठी चांगले असते. 

(Image : Google)

३. आलं - मीठ 

आलं चवीने तिखट असले तरी खोकल्यावर आले अतिशय गुणकारी असते. त्यामध्ये ॲंटीमायक्रोबियल आणि ॲण्टी इंफ्लमेटरी गुणधर्म असतात. आलं ठेचून त्यामध्ये मीठ घालून त्याचा रस मीठ घालून घेतल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. आल्याचा चहा घेतल्यासही घशाला आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे खोकला झाला असेल तर आधी हे घरगुती उपाय करुन पाहा आणि नंतरच डॉक्टरांकडे जा.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी